मुंबई– मुंबईच्या सागरी किनारा मार्गावर (कोस्टल रोड) भरधाव वेगात असलेल्या लॅम्बोर्गिनी या आलिशान गाडीचा ताबा सुटून ती दुभाजकाला धडकली. रविवार सकाळी दक्षिण दिशेला जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. अपघातामुळे गाडीचा पुढील भाग पूर्णपणे तुटला. मात्र, चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी यासंदर्भातील चित्रफित त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई कोस्टल रोड ज्याला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड’ असे नाव आहे. हा मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी तयार केलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गाचा मरीन ड्राईव्ह ते वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक पर्यंतचा पहिला टप्पा ११ मार्च २०२४ रोजी सुरू झाला आहे.
भरधाव वेगामुळे घडला अपघात
रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास या मार्गावर आलिशान लॅम्बोर्गिनी गाडीचा अपघात झाला. पहाटे पावसामुळे रस्ता ओला झाला होता. वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय अतिश शहा हे नेपियन सी रोड येथील रहिवासी असून गाडी घेऊन कुलाब्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी अचानक गाडीवरील ताबा सुटून ती दुभाजकाला धडकली आणि पुढे जाऊन थांबली. गाडी घसरल्यामुळे शहा यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. या अपघाताचे कारण रस्त्याचा ओलावा असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. तरीही पोलिसांनी गाडीच्या तांत्रिक तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) सांगितले आहे.
चालकाविरोधात गुन्हा दाखल
वरळी पोलिसांनी गाडीच्या चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ सोबतच भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम २८१, १२५, ३२४(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. गाडी घसरल्यामुळे शहा यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, असे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी सांगितले.
उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्याकडून चित्रफित समाजमाध्यमावर
उद्योगपती आणि कारप्रेमी असलेल्या गौतम सिंघानिया यांनी या अपघाताची चित्रफित समाजमाध्यमावर (सोशल मीडिया) पोस्ट केली आहे. ही चित्रफित व्हायरल झाली आहे. यामुळे रस्ते सुरक्षा आणि अशा महागड्या गाड्यांच्या रचनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी देखील अपघात
कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी गाडीचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २५ डिसेंबर २०२४ रोजी याच मार्गावर इटालियन सुपरकारच्या दुसऱ्या मॉडेलने पेट घेतला होता. त्यावेळी अग्निशमन दलाने ४५ मिनिटांत आग विझवली. त्या अपघातातही कोणीही जखमी झाले नव्हते.
आलिशान लॅम्बोर्गिनी
लॅम्बोर्गिनी ही एक जगप्रसिद्ध इटालियन कंपनी आहे. सर्वसाधारणपणे, भारतात लॅम्बोर्गिनीची किंमत ४.५ कोटी रुपयांपासून सुरू होते आणि ८.७ कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. जी तिच्या आलिशान आणि अत्यंत वेगवान स्पोर्ट्स कार साठी ओळखली जाते. ही कंपनी ऑटोमोबाइल उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित नावांपैकी एक आहे. लॅम्बोर्गिनीच्या गाड्या त्यांच्या धारदार आणि आक्रमक डिझाइनसाठी ओळखल्या जातात. त्यांचे स्वरूप एखाद्या लढाऊ विमानासारखे किंवा अंतराळयानासारखे दिसते.या गाड्यांमध्ये शक्तिशाली इंजिन वापरले जातात, ज्यामुळे त्या काही सेकंदातच खूप मोठा वेग पकडू शकतात. त्यांचा वेग आणि आवाज हे या गाड्यांचे खास वैशिष्ट्य आहे. लॅम्बोर्गिनीच्या अनेक प्रसिद्ध मॉडेल्सची नावे स्पॅनिश ‘फायटिंग बुल्स’ (लढाऊ बैलांच्या) नावांवरून ठेवली आहेत. म्युरसीलागो, एव्हेंटाडोर, युरस अशी त्यातील काही नावे आहेत.