मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने रेल्वे रुळांवर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. ती पालिकेच्या सीबीएसई शाळेत शिकत होती. क्लासला जाण्याच्या निमित्ताने ती घराबाहेर पडली आणि तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुलगी नेहमीप्रमाणे दुपारी शाळेतून घरी आली. घरी आल्यानंतर तिने दुपारचे जेवण केले आणि ट्यूशनसाठी निघाली. त्यानंतर ती एसी बसमध्ये चढली आणि मुलुंड स्टेशनवर उतरली. बसमधून उतरल्यानंतर ती मुलगी मुलुंड रेल्वे स्थानकात शिरली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर पोहोचली. येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल जातात.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना काय दिसलं?

सीसीटीव्ही फुटेजनुसार ती काही वेळ प्लॅटफॉर्मवर थांबली होती. यादरम्यान ती तिच्या विचारात मग्न दिसली. ६.१० ची जलद सीएसएमटी लोकल मुलुंड स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर येत होती. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच ती रेल्वे रुळांवर उतरली. धक्कादायक म्हणजे, तिने घाईगडबडीत रेल्वे रुळावर उडी मारली नाही किंवा तिचा तोलही गेला. तर, ती अत्यंत शांतपणे रुळांवर उतरली आणि तेवढ्यात जलद लोकल तिच्या अंगावरून गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

आत्महत्येमागचं कारण काय?

अपघातानंतर तिचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिच्या ट्युशन बॅगमधून मिळालेल्या तपशिलांच्या आधारे तिच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संपर्क सांगून घडलेली माहिती सांगितली. तिच्या पालकांसाठी ही घटना अत्यंत धक्कादायक होती. कारण, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी कोणतीही घटना तिच्या आयुष्यात घडलेली नाही. तसंच, तिच्या बोलण्या-वागण्यातूनही काही जाणवलं नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस लवकरच मुलीच्या शाळा आणि शिकवणी कर्मचारी आणि मैत्रिणींशी बोलून या आत्महत्येमागचं कारण शोधणार आहेत. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.