मुंबई : ऑनलाईन जुगारात सात लाख रुपये हरल्यामुळे सोनसाखळी चोरी करण्यास सुरूवात केलेल्या दोन तरूणांना माटुंगा पोलिसांनी अटक केली. आरोपी तरूणाने मित्र व खासगी व्यक्तींकडून पैसे उसने घेऊन जुगार खेळला होता. त्यामुळे रक्कम परत देण्यासाठी त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीत सांगितले. आरोपींचा इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबतही माटुंगा पोलीस तपास करीत आहेत.

वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी चोरली

माटुंगा पोलिसांच्या हद्दीत १९ जुलै रोजी जैन मंदिरात दर्शन घेऊन तक्रारदार विजया हरिया (७४) घरी जात होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यानंतर ते मोटरसायकलवरून पळून गेले. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवाार यांनी उपनिरीक्षक सुनील पाटील यांना तपास करून तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले.

तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपींचा शोध

गुन्हा दाखल झाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास करून मोहिम अशोक संगिशेट्टी (२२) व रोहित ओमसिंह गौंड (१९) या दोघांना अटक केली. दोघेही कुर्ला पश्चिम येतील रहिवासी आहेत. दोघांनीही महाविद्यालयीन शिक्षण मधेच सोडले होते. सध्या ते बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ऑनलाईन जुगारात सात लाख रुपये हरला

आरोपींपैकी मोहितला ऑनलाईन जुगाराचा नाद लागला होता. समाज माध्यमांवर ऑनलाईन जुगार खेळण्यास त्याने सुरूवात केली होती. त्यासाठी त्याने सुरूवातीली स्वतः जवळील पैसे वापरले. पण त्यानंतर त्याने मित्र व खासगी व्यक्तींकडून उसने पैसे घेतले आणि ऑनलाईन जुगार खेळण्यास सुरूवात केली. त्यात तो सात लाख रुपये हरला. गेले वर्षभर तो जुगार खेळत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी चोरी

ऑनलाईन जुगारात सात लाख रुपये हरल्यानंतर उसने घेतलेली रक्कम परत कशी करायची असा मोठा प्रश्न आरोपी मोहित समोर होता. तसेच काही मित्र पैशांची मागणीही करू लागले होते. त्यामुळे मोहितने सोनसाखळी चोरी करून पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. त्याने साथीदार रोहितलाही हाताशी घेतले. आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच ९.८० ग्रॅम वजनाची (किंमत ९० हजार रुपये) सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली. आरोपींच्या इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबत पोलीस तपास करीत आहेत.