मुंबई : पत्नीने पोलिसात तक्रार केल्याने तिला आणि तिच्या भावाला त्रास देण्यासाठी एका डॉक्टरने अनोखे षडयंत्र रचल्याचे उघड झाले आहे. १८ वर्षीय तरुणीला त्याने हाताशी धरले. या तरुणीने डॉक्टरच्या पत्नीच्या भावाविरोधात कांदिवली आणि पुण्यात तीन वेळा बलात्कार आणि सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसात दिली. पत्नीच्या भावाला पोलीस अटक करून तुरुंगाच टाकतील, असे डॉक्टरला वाटले होते. मात्र पोलीस तपासात तरुणीच्या जबाबातील विसंगतीमुळे डॉक्टरचे बिंग फुटले.

एक १९ वर्षांची तरुणी ८ जुलै रोजी समता नगर पोलीस ठाण्यात आली होती. तिच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते असलेली महिला आणि एक इसम होता. त्या मुलीने तिच्यावर बलात्कार आणि सामूहिक बलात्कर झाल्याचे सांगितले. कांदिवली येथे जानेवारी २०२४ मध्ये आयोजित नववर्षाच्या पार्टीत अमोल (नाव बदललेले) नावाच्या २५ वर्षांच्या तरुणाने बलात्कार केला. तेव्हा ती अल्पवयीन होती. काही दिवसांनी तो तिला कॅटरींगचे काम मिळवून देतो असे सांगून पुण्याला घेऊन गेला. तेथेही त्याने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती.

दीड महिन्यांपूर्वी आरोपी तिला पुन्हा आपल्या गाडीतून पुण्याला घेऊन गेला. तेथे एका बंगल्यात तिला नेले. यावेळी आरोपीचा आणखी एक मित्र तेथे होता. या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यावेळी तिची आणखी अश्लील छायाचित्रे काढण्यात आली, असे तिने तक्रारीत म्हटले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समता नगर पोलिसांनी अमोल (२५) आणि त्याच्या मित्राविरोधात कलम ६४ (२), ६४ (२) (ड), ७० (१) पोक्सो ८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याच्या तपासासाठी विविध पथके स्थापन केली होती.

पुण्यातील घटनास्थळावरून संशय

मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित तरुणी अल्पवयीन असताना २०२४ मध्ये तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला होता. नंतरची घटना पुण्यात घडली होती. तिला पुण्यातील घटनास्थळ आणि ठिकाण अचूक माहीत होते. परंतु तिला कांदिवलीतील घटनास्थळ सांगता येत नव्हते. पोलिसांना तिच्या जबाबात विसंगती वाटत होती आणि यात वेगळेच काही तरी शिजत असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी सर्व शक्यता तपासून पाहिल्या. समता नगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे स्वत: या प्रकरणाचा तपास करीत होते. संशयित आरोपी अमोलला पोलीस अटक करणार होते. परंतु बर्वे यांना संशय आल्याने त्यांनी मुलगी आणि तिच्या सोबत असलेल्यांची उलटतपासणी केली. त्यावेळी सत्य समोर आले.

डॉक्टरने असा रचला बनाव…

या कथित बलात्काराच्या आरोपाच्या नाट्याचा सूत्रधार एक प्रसिध्द डॉक्टर होता. या डॉक्टरच्या पत्नीने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तिचा भाऊ अमोल तिला मदत करीत होता. त्यामुळे डॉक्टरचा पत्नी आणि तिच्या भावावर राग होता. या दोघांना धडा शिकविण्यासाठी त्याने हे कुभांड रचले. आपल्या चालकाच्या मदतीने त्याने बीड जिल्ह्यातील १८ वर्षांच्या गरीब मुलीला पैशांचे आमिष दाखवून यासाठी तयार केले. पोक्सो गुन्हा असल्याने पोलीस पत्नीच्या भावाला तात्काळ अटक करतील असे डॉक्टरला वाटले होते. त्याची योजना यशस्वी झाली होती, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे निरपराध व्यक्ती अटक होण्यापासून वाचला. या प्रकरणी आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायायलयात अर्ज करणार आहोत, तसेच खोटी कहाणी रचून षडयंत्र आखणाऱ्या डॉक्टर आणि अन्य तिधांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांनी दिली.