मुंबई : डेटींग ॲपवरून २८ वर्षीय महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने या डॉक्टरला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडून तिची खासगी छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. अखेर हा प्रकार सहन न झाल्याने फिर्यादी डॉक्टरने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला २८ वर्षांची डॉक्टर आहे. सध्या ती अंधेरी येथील प्रसिध्द रुग्णालयात कार्यरत आहे. ती मूळची कोकणातील असून शिक्षण आणि नोकरीसाठी एकटी मुंबईत राहते. पूर्वी ती नवी मुंबई येथील खासगी रुग्णालयात काम करीत असताना तिथेच एका इमारतीत रहात होती. एकटी असल्याने २०२३ मध्ये तिने मैत्री करण्यासाठी ‘हिंगे’ नावाच्या डेटींग ॲपवर आपले नाव नोंदवले होते. त्यावेळी तिची ओळख मुंबईतील डोंगरी येथे राहणाऱ्या खालिद खानयारी (२७) याच्याशी झाली. त्याचा काश्मिरी शॉल विक्रीचा कौटुंबिक व्यवहार होता.
डेटींग ॲपवर दोघांची मैत्री झाली. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी खालीद तिला भेटण्यासाठी नवी मुंबई येथील घरी आला होता. तेथे दोघांनी परस्पर संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ते दोघे नियमित भेटू लागले आणि त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित होत होते. या काळात खालिदने तिचे खासगी छायाचित्र काढून ठेवले होते.
दरम्यान, फिर्यादी डॉक्टर १८ फेब्रुवारी २०२५ पासून अंधेरी येथील प्रसिध्द रुग्णालयात कामाला रुजू झाली. तिला २७ फेब्रुवारी रोजी आपण गर्भवती असल्याचे समजले. मात्र खालिदने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि गर्भपात करण्यास भाग पाडले.
या गोळ्यांमुळे तिच्या प्रकृतीवर परिणाम झाला. यानंतर खालिद तिला टाळू लागला. फिर्यादी खालिदच्या घरी गेली आणि त्याच्याविषयी चौकशी केली. तेव्हा खालिदचा १० ऑक्टोबर २०२४ रोजीच साखरपुडा झाल्याचे तिला समजले. खालिद तिला फसवून शरीरसंबंध प्रस्थापित करीत होता. याचा जाब विचारल्यावर तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि त्याबद्दल तुला कसलेच आश्वासन दिले नव्हते, असे खालिदने तिला सांगितले.
मैत्रीच्या काळात काढलेली दोघांची छायाचित्रे वायरल करण्याची धमकी तो देऊ लागला. त्यामुळे फिर्यादी डॉक्टरने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी खालिद विरोधात धमकावणे, संमतीशिवाय बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडणे आदींसाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१ (२) आणि ८९ अन्वये गुन्हा दाखल केला.