मुंबई : लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या दोन घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावऱण पसरले आहे. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली असून गस्ती वाढवणे, संरक्षक भिंत घालणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. झोपडपट्टीचा परिसर असलेल्या भागात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसांत धावत्या लोकलवर दगडफेक करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये दोन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. पुन्हा असे प्रकार झाल्यामुळे महिला प्रवासी भयभीत झाल्या आहेत.

आम्ही प्रवास कसा करायचा ?… महिला प्रवाशांचा सवाल

संध्याकाळी कार्यालयातून घरी येताना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे नाईलाजाने दरवाजाजवळ उभे रहावे लागते. दगडफेकीच्या घटनांमुळे आता प्रवास करायला भीती वाटू लागली आहे. कुठल्याही क्षणी दगड येऊन लागेल की काय अशी भीती वाटत असल्याचे टिळकनगरला राहणाऱ्या शेफाली शिंदे यांनी सांगितले. हार्बर मार्गावर रुळांजवळ दाट लोकवस्ती आहे. तेथून असे प्रकार सर्वाधिक होतात. तेथे पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे मत कुर्ल्यात वास्तव्याला असलेल्या सोनाली कंरजकर यांनी व्यक्त केले.

संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करणार

दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे रूळालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हार्बर मार्गावरही ते लवकरच पूर्ण केल जाईल, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. रेल्वे मार्गाजवळील व स्थानक परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. याशिवाय नियमित गस्तीत वाढ करण्यात आली आहे, असे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी सांगितले. रेल्वे रूळालगत असलेल्या झोपडपट्टी परिसरात जाऊन जनजागृतीही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. झोपडपट्ट्या, रेल्वे मार्गालगतच्या परिसकरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. दगडफेक केल्याने अपघात होऊन जीविताला धोका होतो, तसेच हा गंभीर गुन्हा असून त्याबद्दल करण्यात येणाऱ्या शिक्षेची जाणीव करून देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक नेत्यांचीही मदत घेतली जाणार आहे.