मालाड येथील जनकल्याण नगरमधील एका २१ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये शनिवारी भीषण आग लागली होती. या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षीय महिलेने आगीपासून बचाव करण्यासाठी भितीपोटी बाल्कनीतून खाली उडी मारली. या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मालाड येथील जनकल्याण नगरमधील ‘मरिना एन्क्लेव्ह’ या २१ मजली इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीत आग लागताच रहिवाशांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले. आगीपासून बचाव करण्यासाठी या इमारतीमधील एका महिलेने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. जखमी झालेल्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांना काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या महिलेच्या घरी होमहवन सुरू होते. त्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.