मुंबई – स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून १६ जणांची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भांडूप पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आपण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एमएमआरडीए) अधिकारी असल्याचे सांगितले होते.
या प्रकरणी भांडूप पोलिसांनी नीता अंकुश सराईकर आणि लक्ष्मी किशन बांदे (उर्फ अक्का) या दोन महिलांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची ६० वर्षीय तक्रारदार मीरा सुदन्ना कांबळे यांनी दाखल केली आहे. तक्रारीनुसार, जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान, आरोपी महिलांनी कांबळे आणि इतर १५ जणांना विक्रोळी (पूर्व) आणि भांडूप परिसरातील एमएमआरडीए वसाहतींमध्ये कमी दरात घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या महिलांनी बँकांकडून कर्ज घेऊन आरोपींना पैसे दिले. लक्ष्मी बांदे हिने नीता सारायकरला चाळ विभागातील अधिकारी म्हणून ओळख करून दिली.
कांजूरमार्गमधील कार्वेनगर येथे प्रत्येकी आठ लाख रुपयांमध्ये सदनिका मिळतील, असे आश्वासन दिले. विश्वास संपादन करण्यासाठी पुढील तारखेचे दोन धनादेश महिलांना देण्यात आले तसेच स्टॅम्प पेपरवर महिलांचे छायाचित्र व स्वाक्षऱ्या घेतल्या. पण घरे मिळाल्याची कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत. तसेत घेतलेली रक्कमही परत दिली नाही.