मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात एकूण १ लाख ९७ हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांचा विचार करता ही संख्या सात ते आठ हजारांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा अकरा दिवसात दोन लाखांपेक्षाही अधिक मूर्तींचे विसर्जन होत असते. त्या तुलनेत यंदा गणेशमूर्ती कमी झाल्याचे दिसते आहे.

मुंबईत गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाचा उत्साह होता. पर्यावरणपूरक मुर्ती विरुद्ध पीओपीच्या मूर्ती असा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू असून यावर्षी हे प्रकरण थेट न्यायालयातच गेले होते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर न्यायालयाच्या निकालाचे सावट होते. तसेच विसर्जनाच्याबाबतही अनिश्चितता होती. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आणि विसर्जन कसे असेल याबाबत सर्वच स्तरावर साशंकता होती. सहा फूटापर्यंतच्या सर्वच मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या तर सहा फुटावरील सर्वच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यात आले.

अनेक भक्तांनी यंदा घरगुती गणेशमूर्तीही आवर्जून शाडूच्या मातीची घेतली. मात्र, तरीही त्यांना कृत्रिम तलावातच विसर्जन करावे लागले. त्यामुळे भक्तांनी विसर्जन स्थळावर, समाज माध्यमांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. साशंकतेच्या वातावरणामुळे की काय यंदा गणेशमूर्तींची संख्या घटलेली दिसते आहे.

सन २०१८ मध्ये दोन लाख ३६ हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. करोना काळात मूर्तींची संख्या घटली होती. मात्र त्यानंतरही हा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला होता. यंदा मात्र दोन लाखांच्या आतच मूर्तींची संख्या असल्याचे आकडेवारीवरून आढळून आले आहे.

दरम्यान, याबाबत पालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की यंदा विसर्जन दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू होते. त्यामुळे अंतिम आकडेवारी जास्त असू शकते. या आकडेवारीचा आम्ही जरूर अभ्यास करू. तसेच आम्ही आधीपासून भक्तांना गणपतीचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याचे आवाहन करत होतो. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती स्तरावर विसर्जन करण्यात आले असण्याची शक्यता आहे, असेही मत सपकाळे यांनी व्यक्त केले आहे.

२०२३ ची आकडेवारी

  • एकूण मुर्ती – २ लाख ५ हजार ७२२
  • कृत्रिम तलावात विसर्जन – ७६ हजार ७०९

२०२४ ची आकडेवारी

  • एकूण मुर्ती – २ लाख ५ हजार २२२
  • सार्वजनिक – १०, २१४
  • कृत्रिम तलावात – ८१,८५८

२०२५ ची आकडेवारी

  • एकूण मुर्ती – १ लाख ९७ हजार ११४
  • घरगुती – १ लाख ८१ हजार ३७५ (बहुतांशी सर्वच कृत्रिम तलावात)
  • सार्वजनिक – १० हजार १४८