मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आरोग्य सेविकांना बोनसऐवजी १४ हजार रुपये किमान भाऊबीज भेट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र ही किमान भाऊबीज भेट भाऊबीजेपूर्वी तरी मिळावी अशी अपेक्षा आरोग्य सेविकांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी गेल्या आठवड्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसची घोषणा केली. मुंबई महापालिकेचे एकूण ९० हजाराहून अधिक कर्मचारी असून महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) अशा सगळ्यांनाच ३१,००० रुपये बोनस देण्यात आला आहे. तर सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट रुपये १४,००० रुपये जाहीर करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला असला तरी आरोग्य सेविकांना अद्याप भाऊबीज भेट मिळालेली नाही. त्यामुळे किमान भाऊबीजेपूर्वी म्हणजे २३ ऑक्टोबरपूर्वी ही रक्कम खात्यात जमा व्हावी अशी अपेक्षा मुंबई मनपा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे.
दरवेळी आरोग्य सेविकांनी भाऊबीज भेट ही दिवाळीनंतरच मिळते. त्यामुळे माजी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी आरोग्य सेविकांना भाऊबीज भेट दिवाळी सण सुरु होण्यापूर्वी देण्याचे आदेश दिले होते. यंदा किमान भाऊबीजेपूर्वी तरी ही भेट देण्याची व्यवस्था करावी जेणे करून भाऊबीजेला त्याचा लाडक्या बहिणींना उपयोग होईल. आता काटछाट न करता पूर्ण रक्कम द्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष ऍड प्रकाश देवदास यांनी केली आहे.
मुंबईतील घराघरांमध्ये फिरून बालकांचे लसीकरण करणे अ जीवनसत्त्व वाटप, जंतुनाशक कार्यक्रम, स्त्राी-पुरुष नसबंदी, संसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधणे, पल्स पोलिओसारखे कार्यक्रम राबविणे अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे काम आरोग्य सेविका करीत असतात. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सुमारे चार हजार आरोग्य सेविका कार्यरत आहेत.
