मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर रविवारीही कायम होता. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबईकरांच्या छातीत धडकी भरली होती. मात्र, साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे अनेकांनी रविवारी घराबाहेर पडणे टाळले. दरम्यान, नवरात्रोत्सवामुळे अनेकांनी मंदिरात दर्शनासाठी जाण्याचे बेत आखले होते, परंतु कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी घरात बसणे पसंत केले.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला. रविवारी पहाटेपासून मुंबई शहर व उपनगरात पावसाचा जोर आणखी वाढला. हवामान विभागानेही रविवारी मुंबईला रेड अलर्ट दिला होता. तसेच, आवश्यकता असल्यास घरातून बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले होते. त्यामुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे बेत रद्द केले. मुसळधार पावसामुळे समुद्रकिनारे, उद्याने, बाजारपेठा ओस पडल्या होत्या. साप्ताहिक सुट्टीमुळे कर्मचारी व शालेय विद्यार्थी घराबाहेर पडले नाहीत. तसेच रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसत होती. मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे झोपडपट्टी भागातील अनेक गल्ली – बोळात पाणी साचले होते. त्याचा नागरिकांना फटका बसला. अंधेरी सब वे (अंधेरी पश्चिम) येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक सकाळच्या सुमारास पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, काही वेळानंतर येथे साचलेले पाणी ओसरले आणि वाहतूक पूर्ववत झाली.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर आणि ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक होता. तर, पश्चिम रेल्वेवरही रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेकांनी रविवारी घरातच बसणे पसंत केले.
दरम्यान, कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील, विजांच्या गडगडाटासह व ४०-५० किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहतील. तसेच, काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी कर्मचारी व विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे.
भरतीच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास मनाई
हवामान खात्याने पुढील २४ तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास महानगरपालिका प्रशासनाने मनाई केली आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन क्रमांक कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत.
वातानुकूलित लोकलमध्ये गळती
पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलला पावसाचा फटका बसल्याचे निदर्शनास आले. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी – भाईंदरदरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये शनिवारी गळती होत होती. याबाबतची ध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती.