मुंबई: देशातील तरुण पिढीला आरोग्यविज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने अलीकडेच ‘शाईन’ (सायन्स अँण्ड हेल्थ इनोव्हेशन फॉर द नेक्सजेन एक्सप्लोरर्स) हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विज्ञान आणि आरोग्य संशोधनातील संधींबाबत जागरूकता निर्माण करून पुढील पिढीतील वैज्ञानिक, डॉक्टर आणि संशोधक घडवण्याचा यामागचा हेतू आहे. आयसीएमआरच्या अधिकृत माहितीनुसार, हा उपक्रम देशभरातील ९ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थी तसेच पदवीपूर्व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उद्दिष्ट मानून राबवला जाणार आहे.

‘शाईन’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा भेटी, संशोधकांशी संवाद, लघु संशोधन प्रकल्प, आणि विज्ञान-आरोग्य विषयक चर्चासत्रे यांची संधी मिळणार आहे. विज्ञान-आरोग्य क्षेत्रातील करिअर पर्याय, सार्वजनिक आरोग्य संशोधनातील आव्हाने, आणि नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य समस्यांचे निराकरण अशा विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे आयसीएमआरच्या सूत्रांनी सांगितले. यासाठी देशभरातील विविध शाळांमध्ये जाऊनही प्रात्यक्षिके केली जात आहेत.

प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम केले जाणार असून जास्तीत जास्त वैज्ञानिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. जगभरात तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. एआयमुळे तर मोठी क्रांती आगामी काळात होणार असून यासाठी भारताने सज्ज राहाणे गरजेचे आहेय यासाठी पुढील पिढीला त्यासाठी तयार करणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनइपी-२०२०) च्या ‘बाह्य शिक्षण’ संकल्पनेशी सुसंगत अशा या कार्यक्रमांतर्गत देशभरातील आयसीएमआरच्या २७ राष्ट्रीय संस्था आणि १५ क्षेत्रीय वैद्यकीय संशोधन केंद्रे ही विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शिक्षण व प्रात्यक्षिकांचे व्यासपीठ ठरत आहेत. २०२३-२४ मध्ये आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, संस्थेच्या विविध प्रशिक्षण आणि आऊटरीच कार्यक्रमांमध्ये १५,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते, तर २०२५ पर्यंत हा आकडा ५०,००० वर नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशातील तरुण वैज्ञानिकांची संख्या अद्याप लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे. जागतिक बँकेच्या २०२२ च्या आकडेवारीनुसार, भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे केवळ सुमारे २५५ संशोधक आहेत, तर जागतिक सरासरी १,३०० आहे. ‘शाईन’ सारखे उपक्रम ही दरी भरून काढण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. तथापि यासाठी जी आर्थिक तरतूद देशाच्या अर्थसंकल्पात करणे आवश्यक आहे तेवढा निधी तसेच आवश्यक ते तंत्रज्ञान उभे करून देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ग्रामीण व शहरी भागात समान संधी

या उपक्रमात ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्यावर विशेष भर असेल. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन प्रशिक्षण, व्हर्च्युअल लॅब टूर, आणि क्विझ-चॅलेंजेस यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्वांशी संवाद साधण्याची संधी मिळावी म्हणून नामांकित वैज्ञानिक, आरोग्य धोरणतज्ज्ञ आणि उद्योजक यांना ‘शाईन टॉक्स’ मालिकेत आमंत्रित केले जाणार आहे.

आयसीएमआरच्या मते, देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत नेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, जैववैद्यकीय संशोधन आणि नावीन्यपूर्ण विज्ञानात तरुण पिढीचा सहभाग वाढवणे अत्यावश्यक आहे. ‘शाईन’ हा उपक्रम केवळ करिअर मार्गदर्शनापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित करण्याचा एक राष्ट्रीय प्रयत्न आहे.