मुंबई : रामदास कदम यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर १४-१५ वर्षांनंतर कंठ फुटला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्री केले. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर त्यांनी मंत्रिपद का स्वीकारले? मुलाला आमदारकी दिली. जोपर्यंत उद्धव ठाकरेंकडून मिळत होते तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. रामदास कदम म्हणतातत त्याप्रमाणे त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. त्यांनी केलेल्या आरोपांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठाेकणार आहे. या दाव्यातून जी रक्कम येईल ती पूरग्रस्तांना पाठवण्यात येईल, अशा शब्दांत शिवसेना नेते सचिव अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच रामदास कदम यांच्या पत्नीने १९९३ मध्ये पेटवून का घेतलं होतं? या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे हाल करण्यात आले. मृत्यूनंतर त्यांचे कागदपत्रांवर ठसे घेण्यात आले, असे आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले. या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. रामदास कदम यांना उत्तर देण्याची गरज नव्हती मात्र आमच्या दैवताच्या मृत्यूवर त्यांनी संशय घेतला म्हणून उत्तर देत असल्याचे अनिल परब म्हणाले. बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी आपण २४ तास तिथे होतो, त्या घटनेचे आपण साक्षीदार आहोत, असे सांगताना बाळासाहेब २०१२ ला गेले, २०१४ ला रामदास कदम मंत्री झाले. त्यांना मंत्री उद्धव ठाकरेंनी केले, ते इतके वाईट होते तर मंत्रीपद का स्वीकारले?मुलाला आमदारकी दिली. जोपर्यंत उद्धव ठाकरेंकडून मिळत होते तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. स्वतः मराठा स्वाभिमानी समजता तर त्याच वेळी हा पक्ष सोडून जायला पाहिजे होते, असे परब म्हणाले.
रामदास कदम यांच्या बायकोने जाळून घेतले की जाळले?
यावेळी वैयक्तिक पातळीवर जात अनिल परब यांनीही कदम यांच्यावर आरोप करीत संशय व्यक्त केला. रामदास कदम यांच्या पत्नीने १९९३ साली स्वतःला जाळून घेतले. ते जाळून घेतले की तिला जाळले हे देखील नार्को टेस्टमध्ये आले पाहिजे. खेडमध्ये कोणाला बंगले बांधून दिले, त्या बंगल्यावरून काय गोंधळ झाला हे सगळे बाहेर आले पाहिजे. जर हे नार्को टेस्टमध्ये बाहेर नाही आले तर त्यांचा मुलगा योगेश कदम गृहराज्य मंत्री आहेत. आपल्या वडिलांनी न काय उद्योग केले आहेत १९९३ ला याची देखील चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी आहे की १९९३ ला गृहराज्य मंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतले होते, त्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असा अरोप अनिल परब यांनी केला.
येणाऱ्या अधिवेशनात पुराव्यासह अनेक प्रकरणे मांडणार
मागच्या अधिवेशनात योगेश कदम यांना मुख्यमंत्र्यांनी वाचवले होते. मुख्यमंत्री का त्यांना वाचवत आहेत? डान्स बार चालवत आहेत, दादागिरी करत आहेत, जमिनी हडपल्या आहेत. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे, त्याचा शोध देखील योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. या अधिवेशनात त्यांची दोनच प्रकरणे समोर आली आहेत. येणाऱ्या अधिवेशनात पुराव्यासह अनेक प्रकरणे मांडणार असल्याचा इशारा परब यांनी दिला.
बाळासाहेबांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा – रामदास कदम
बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव दोन दिवस ठेवले होते का, याची सीबीआय चौकशी करा, अशी नवीन मागणी आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. याविषयी फडणवीसांना लेखी पत्र लिहणार असलयाचे कदम म्हणाले. अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या अज्ञानाचे प्रदर्शन केले आहे. मी माझ्या बोलण्यात डॉक्टरांचा संदर्भ दिला होता. त्या डॉक्टरांवरही ते अब्रुनुकसानीचा दावा करणार आहेत का. त्यांच्याकडे पैसे कमी पडले असतील म्हणून ते दावा करणार आहेत, अशी टीका करताना स्टोव्हचा भडका उडाल्याने पत्नी जळाल्याचे स्पष्टीकरण कदम यांनी केले.