मुंबई : भिवंडी आणि आसपासच्या दहा गावातील ५८.५२ हेक्टर क्षेत्राचा आर्थिक केंद्र (ग्रोथ सेंटर) म्हणून विकास करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या क्षेत्राचा आर्थिक केंद्र म्हणून विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय गुरुवारी नगर विकास विभागाने प्रसिद्ध केला. आता एमएमआरडीएकडून ५८.५२ हेक्टर जागेचा विकास इंटिग्रेटेड बिझनेस पार्क म्हणून करण्यात येणार आहे.
मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता यावे, यासाठी एमएमआरडीएकडून अटल सेतू बांधण्यात आला आहे. या अटल सेतूमुळे सेतू प्रभावित क्षेत्रात विकासाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. विकासाच्या या संधी लक्षात घेत एमएमआरडीएने खोपटा परिसर, पोयनाड परिसर, खारबाव परिसर, बोईसर परिसर, नेरळ परिसर, कर्जत परिसर, अलिबाग परिसर आणि पेण अशी ही आठ आर्थिक केंद्र (ग्रोथ सेंटर) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या आर्थिक केंद्रास आधीच मान्यता देण्यात आली आहे. तर आता यापैकी एक असलेल्या खारबाव आर्थिक केंद्राच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मलोडी, पाये, पायेगाव, खर्डी, पालीवली, फिरंगपाडा, ब्राम्हणगावसह एकूण दहा गावांचा समावेश खारबाव आर्थिक केंद्रात आहे. तर ५८.५२ हेक्टर क्षेत्राचा विकास आर्थिक केंद्र म्हणून केला जाणार आहे. अशा या आर्थिक केंद्राच्या विकासासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेशाचा विकास ग्रोथ हब अर्थात जागतिक आर्थिक केंद्र म्हणून करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अनुषंगाने येत्या काळात एमएमआरमध्ये मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेत खारबाव आर्थिक केंद्राअंतर्गत दहा गावांचा विकास इंटिग्रेटेड बिझनेस पार्क म्हणून केला जाणार आहे. इंटिग्रेटेड बिझनेस पार्कमध्ये व्यावसायिक संकुले, उद्योग, औद्योगिक क्षेत्राशी संबंधित संकुले उभारली जाण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा सविस्तर आराखडा तयार झाल्यानंतरच इंटिग्रेटेड बिझनेस पार्क नेमके कसे असेल हे स्पष्ट होईल.