मुंबई : छोटेखानी मंत्रिमंडळात विविध भागातील आमदारांना प्रतिनिधित्व देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला  असला तरी त्यातही मुंबई-कोकणचा वरचष्मा असल्याचे दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येतोय, अशा प्रश्नांकित किंवा अनिश्चिततेच्या वातावरणात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या बंडात ताकदीने सहभागी झालेल्या आणि आपापल्या जिल्ह्यात राजकीय वजन असलेल्या आमदारांचा प्राध्यान्यक्रमाने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळात सर्वच विभागांना पुरेसे प्रतिनिधत्व देण्यात आले आहे. विदर्भातून सुधीर मुनगंटीवार व संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेतच. मंत्रिमंडळात विदर्भाचे एकूण तीन मंत्री आहेत. खान्देशातूनही तीन मंत्री करण्यात आले आहेत. त्यात गिरिश महाजन, डॉ. विजयकुमार गावित व गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शंभुराजे देसाई व सुरेश खाडे यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे-पाटील, दादाराव भुसे यांची वर्णी लावण्यात आली आहे. मराठवाडय़ातून अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे. तानाजी सावंत व  अतुल सावे हे चार मंत्री करण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई-कोकणचे पाच मंत्री आहेत. त्यात मंगलप्रभात लोढा (मुंबई), रिवद्र चव्हाण ( ठाणे जिल्हा), उदय सामंत ( रत्नागिरी) व दीपक केसरकर ( सिंधुदुर्ग) यांचा सामावेश आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मुंबई-कोकणचे काहीसे वर्चस्व दिसत आहे.

भाजपने मुंबईतील मंगलप्रभात लोढा यांना संधी दिली असली तरी शिंदे गटाने मुंबईतील एकाचाही समावेश केलेला नाही.