मुंबई : काम अंतिम टप्प्यात आलेले असताना लोअर परळ पुलावरील दक्षिण वाहिनी बेकायदेशीररित्या वाहतुकीसाठी खुली केल्याप्रकरणी वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर आणि १५ ते २० अनोळखी व्यक्तींविरोधात मुंबई महानगरपालिकेने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार ना. म. जोशी. पोलीस ठाण्याने शनिवारी पहाटे याप्रकरणी आदित्य ठाकरेंसह सर्वांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. त्यामुळे लोअर परळ आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला होता. या पुलावरील दक्षिण वाहिनीचे काम पूर्ण होत आले असून पथदिवे, मार्गिका आखणी, रंगकाम आदी कामेही लवकरच पूर्ण करून हा पूल तीन-चार दिवसांत वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस होता. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी पुलावरील दक्षिण वाहिनीवरील रस्ता रोधक हटवून, नारळ फोडून ती वाहतुकीसाठी खुली झाल्याचे जाहीर केले.

हेही वाचा : म्हाडा कोकण मंडळ सोडत डिसेंबर २०२३ : अर्जविक्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ हजार ७५५ अर्ज दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वाहिनीची स्थिरता चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या वाहिनीवरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने मुंबई महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता पुरूषोत्तम इंगळे यांनी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर यांच्यासह १५ ते २० अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. इंगळे यांच्या तक्रारीची दखल घेत ना. म. जोशी पोलीस ठाण्याने शनिवारी पहाटे ३.२२ च्या सुमारास आदित्य ठाकरेंसह सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला.