मुंबई : आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर हृदयात जपून ठेवतो. १९५३ साली आलेला आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील ‘श्याम’ आजही आपल्या स्मरणात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे नुकतेच निधन झाले. येत्या २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात माधव वझे यांची खास भूमिका आहे. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. माधव वझे यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट त्यांना श्रद्धांजली असणार आहे, अशी भावना चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञांनी व्यक्त केली.
पोटापाण्याच्या शोधात मुंबईत आलेल्या अमर, अकबर आणि अँथनी या तिघांच्या आयुष्यात एका अनपेक्षित घटनेने कशी खळबळ उडते ? याची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासातील उलथापालथ निस्तरताना त्यांची मैत्री कशी खुलते, हे मजेशीर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक योगेश जाधव यांनी या चित्रपटात केला आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव, तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. ‘ऑल इज वेल’ चित्रपट शुक्रवार, २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे त्रिकुट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून या तिघांसोबत चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. तर चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार – महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी, तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे, तर गीतकार मंदार चोळकर आहेत.
माधव वझे यांच्यासारख्या अनुभवी, कलासंपन्न कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणे, हा आम्हा सर्वांसाठी एक समृद्ध करणारा अनुभव होता. त्यांच्यासोबत चित्रीकरणादरम्यान व्यतीत केलेले क्षण आणि त्यांच्याकडून मिळालेले मोलाचे मार्गदर्शन कधीही विसरता न येण्याजोगे आहे, असे सांगताना, ‘ऑल इज वेल’ चित्रपटाची टीम त्यांच्या आठवणीत भावूक झाली. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या स्मृतींना उजाळा देत एक खास फोटो चित्रपटाच्या टीमने समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरमध्येही ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांची झलक पहायला मिळत आहे.