Maratha Reservation Protest Mumbai : मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या निर्णायक आंदोलनाची मंगळवारी यशस्वी सांगता झाली. राज्यातून आलेल्या हजारो आंदोलकांवरील तणाव निवळला. त्यामुळे मागील ५ दिवस आक्रमक आणि तणावात असलेल्या कष्टकरी आंदोलकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. मुंबईचा निरोप घेऊन आपल्या गावी परत जाताना अनेकांनी मुंबई दर्शन केले, तर दुकाने खुली झाल्याने मनसोक्त खरेदीही केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू होते. राज्याच्या विविध भागातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. बहुतांश आंदोलक राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत आले होते. पाच दिवस सुरू असलेले आंदोलन मंगळवारी संध्याकाळी संपले. मागण्या मान्य झाल्याने आंदोलकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर आंदोलकांनी मुंबई सोडायला सुरुवात केली. आझाद मैदान परिसरात तळ ठोकून असलेल्या रस्त्यावरील गाड्या निघाल्या आणि मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

मुंबई दर्शन आणि खरेदी…

आंदोलनासाठी आलेले बहुतांश कार्यकर्ते श्रमिक आणि कष्टकरी होते. त्यातील अनेक जण पहिल्यांदाच मुंबईला आले होते. त्यांना मुंबईचे आकर्षण आणि नवलाई होती. मात्र आपल्या मागण्यांसाठी ते आझाद मैदान स्थानक परिसरातच मागील ५ दिवस थांबले होते. रात्र फलाटावर काढत होते. मागण्या मान्य झाल्या आणि आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते.

माघारी जाताना अनेकांनी मुंबई दर्शन आणि खरेदी केली. रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या भुयारी मार्गातील दुकाने खुली झाल्याने आंदोलकांनी विविध वस्तू खरेदी केल्या. कुणी घरच्यांसाठी कपडे, अन्य वस्तू खरेदी केल्या. अनेकांनी फॅशन स्ट्रीट परिसरात फेरफटका मारून मुंबई फॅशनेबल कपड्यांची खरेदी केली. मी मुंबईला पहिल्यांदा आलोय. मुंबईबद्दल आजवर ऐकून होतो. स्वस्तात कपडे मिळाल्याने ते विकत घेतले असे एका आंदोलकाने सांगितले. आम्ही जिंकलो ही आमच्यासाठी दिवाळीच आहे. त्यामुळे आम्ही आता मुंबईत फिरतोय आणि खरेदी करतोय, असे परभणीतून आलेल्या आंदोलकाने सांगितले.

अनेक आंदोलक लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनी घरी परतत होते. गाडी सुटण्यास वेळ असल्याने ते खरेदीसाठी आले होते. घरी परतण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील हॉटेल्समध्ये गर्दी केली होती. काही आंदोलक मुलांसाठी मुंबईतून खाऊ खरेदी करताना दिसत होते.

समाधानाने घेतला मुंबईचा निरोप

आम्ही गेली अनेक वर्ष आरक्षणाच्या मागणीसाठी लढत होतो. मुंबईत आम्हाला न्याय मिळाला असे एका आंदोलकाने सांगितले. अनेकांनी मुंबईकरांचे आभार व्यक्त करताना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. आंदोलन संपल्यावर झालेल्या जल्लोषानंतर अनेक आंदोलक आसपास फिरत मुंबईचा झगमगाट मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. आनंदाने आंदोलक रात्री उशीरापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने घरी परतत होते.