मुंबई : मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. या प्रलयंकारी पावसामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनेला शनिवारी २० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने अनेक मुंबईकरांनी समाज माध्यमावर ‘२६ जुलै’च्या कटू आठवणींना वाट मोकळी केली.
मुंबई शहर आणि उपनगरांत २६ जुलै २००५ रोजी विक्रमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे संपूर्ण वाहतूक सेवा ठप्प झाली होत. रस्ते पाण्याखाली गेले होते, शाळा, कार्यालयांमध्ये नागरिकांना अडकून रहावे लागले. दरम्यान, दोन दशकांनतरही त्या दिवसाच्या आठवणी प्रत्येक मुंबईकारंच्या मनात ताज्या आहेत. एक्स, फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनेकांनी तेव्हाची छायाचित्रे आणि आठवणी समाज माध्यमांवर प्रसारित करत ‘माझा २६ जुलै’ ही पोस्ट प्रसारित केली.
त्या दिवशी शाळेतून घरी जाण्यासाठी करावा लागलेला संघर्ष कथन केला, तर कोणी अनोळखी नागरिकांना केलेली मदत आणि माणुसकीचे अनुभव सांगितले. मुंबईकरांसाठी २६ जुलै २००५ हा दिवस अतिवृष्टीसह माणुसकीचा, सहकार्याचा आणि जिद्दीचा दाखला म्हणून कायम स्मरणात राहणार आहे. त्या दिवशी मी दादरहून बोरिवलीपर्यंत पायी चालत गेलो. रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी भरले होते. पण अनोळखी नागरिकांनी अडलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी दिले. त्या दिवशी मुंबईकरांची माणुसकी जवळून अनुभवता आली, अशी भावना चेतन मोरे यांनी फेसबुकवर व्यक्त केली होती. काहींनी त्या दिवशी शाळेत अडकल्याचा अनुभव कथन केला, तर काही तरुण मुलांनी त्यांच्या पालकांचे अनुभव समाज माध्यमांवर प्रसारित केले.
‘त्या’ दिवशी झालेला पाऊस
हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात २६ जुलै २००५ रोजी २४ तासांत ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. लोकल रेल्वे, बससेवा, विमान वाहतूक ठप्प झाली होती. कुर्ला, अंधेरी, चेंबूर, शीव आणि दादर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
‘त्या’ दिवसाची घडामोड तासागणिक
२६ जुलै २००५ रोजी सकाळी ८ वाजता पाऊस सुरू झाला. त्यानंतर ११ वाजता पावसाचा जोर वाढायला लागला. साधारण दुपारी २ च्या सुमारास काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ५ नंतर वाहतूक सेवा ठप्प झाली. रात्री ८ नंतर मुंबईतील हजारो नागरिक रस्त्यावर, कार्यालयात अडकले. दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत अनेक नागरिक कार्यालयात अडकले होते.
३८ तास विमानतळावर
प्रशांत द्विवेदी यांनी २६ जुलै २००५ रोजी मुंबई विमानतळावर तब्बल ३८ तास अडकून राहिल्याचा अनुभव शनिवारी समाज माध्यमांवर सांगितला. द्विवेदी आयआयटी मुंबईच्या एका महोत्सवासाठी कोलकत्याहून मुंबईत आले होते. दरम्यान, परतीचा प्रवास २६ जुलै २००५ रोजी ते विमानतळावर अडकले होते. त्यावेळी त्यांना अन्न-पाण्याशिवाय राहावे लागले होते. विमातळावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागले होते. एकूणच परिस्थिती असह्य होती, असेही ते म्हणाले.