मुंबई: पूर्वी परदेशातून तस्करीच्या मार्गाने येणारा एमडी (मॅफेड्रॉन) हा अमली पदार्थ आता स्थानिक पातळीवर तयार करण्यात येऊ लागले आहे. शेतात, रस्त्याच्या कडेला आडोसा करून, काखान्यात आणि चक्क घरातही कुकरमध्ये एमडी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अमली पदार्थांचा विळखा वाढत चालला आहे. कारवाया करूनही एमडी हा अमली पदार्थ सहज उपलब्ध होऊ लागला आहे. कारण हे अमली पदार्थ आता तस्करीमार्गे न आणता रासायनिक कारखाने, शेतात, गोठ्यात, पत्र्याच्या आडोश्यातील खोल्यांमध्ये आणि चक्क घरातही तयार करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह विविध शहरातील पोलिसांनी केलेल्या कारवाईतून ही बाब उघड झाली आहे.

घरात आणि गोठ्यातही निर्मिती

पूर्वी ‘एमडी’ हे अमली पदार्थ परदेशातून हवाई मार्गाने तस्करी करून भारतात आणला जात होता. परंतु आता तो स्थानिक पातळीवरच तयार केले जाऊ लागला आहे. एप्रिल महिन्यात साकिनाका पोलिसांनी वसईत महामार्गालगत असलेल्या सिमेंट ब्लॉक बनविण्याच्या कारखान्यात छापा टाकून अमली पदार्थाचा कारखाना उध्वस्त केला होता. त्यावेळी तब्बर १२ हजार कोटींचे एमडी (मॅफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे झालेल्या कारवाईत शेतघरात (फार्महाऊस) एमडी तयार करण्यात येत असल्याचे आढळले होते. हे एमडी मिरा रोड येथील एका भाड्याच्या घरात आणून तेथून लहान पाकिटे तयार करून वितरित केले जात होते.

मिरा भाईंदर वसई विरारच्या गुन्हे शाखेने तेलंगणा येथे रासायनिक कंपनीत छापा टाकून १२ हजार कोटींचे एमडी जप्त केले होते. महसूल गुप्तचर संचालनायाने लातूर येथे एका शेतात छापा टाकला होता. तेथे शेतातील गोठ्यात एमडीचा कारखाना तयार करण्यात आला होता. नालासोपारा परिसरात राहणारे नायजेरियन नागरिक घरातच एमडी तयार करत आहेत. एप्रिल महिन्यात पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत एक नायजेरियन महिला घरातच कुकरमध्ये एमडी बनवत असल्याचे आढळले होते.

घरगुती एमडी रोखणे कठीण

एमडी (मॅफेड्रॉन) हे अमली पदार्थ सर्वात जास्त परिणामकारक आणि बनवायला सोपे असल्याचे पोलिसांनी सांगितले. डार्क वेबवर त्याचा फॉर्म्युला, प्रशिक्षण मिळते. एमडी तयार करण्यासाठी लागणारे रसायन औषधविक्रेत्यांकडून मिळवले जाते. त्यामुळे जागोजागी एमडीचे कारखाने आढळून येत आहेत. अनेक रासायनिक कंपन्यामध्येही एमडी तयार केले जात आहे. या स्थानिक पातळीवर तयार करण्यात येत असल्याच्या एमडीची किंमतही कमी असते. त्यामुळे ग्राहकही मोठ्या संख्येने मिळतात आणि दुसरीकडे प्रचंड फायदाही मिळत असल्याने स्थानिक पातळीवर एमडी तयार करण्याचे प्रमाण वाढत चालेल असल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले.