मुंबई: मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अ शनिवारी वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी असा भुयारी मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे. तर आरे ते कफ परेड अशा थेट भुयारी मेट्रो प्रवासासाठी मात्र मुंबईकरांना ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. टप्पा २ ब चे काम पूर्ण करत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो ३ मार्गिकेच्या उभारणीची आणि संचलनाची संपूर्ण जबाबजारी एमएमआरसीकडे आहे. त्यानुसार मागील काही वर्षांपासून एमएमआरसीच्या माध्यमातून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे काम सुरु आहे. ही मार्गिका आतापर्यंत पूर्ण क्षमतेने धावणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांने या मार्गिकेस विलंब झाला आहे.

दरम्यान या मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा एमएमआरसीने ऑक्टोबर २०२४ मध्ये कार्यान्वित केला आहे. या मार्गिकेवरुन मुंबईकर भुयारी मेट्रो प्रवास करत आहेत. तर आता शनिवारपासून मुंबईकरांना आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी असा थेट प्रवास करता येणार आहे. शुक्रवारी (९ मे) बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक अशा टप्पा २ अ चे लोकार्पण होणार आहे.

लोकार्पणानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी हा टप्पा प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा टप्पा खुला होतानाच मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती संपूर्ण भुयारी मार्गिका अर्थात आरे ते कफ परेड असा थेट भुयारी मेट्रो केव्हा सुरु होणार याची. त्यानुसार याविषयी एमएमआरसीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी हा टप्पा ऑगस्टमध्ये सुरु होईल अशी माहिती लोकसत्ताला दिली.आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड टप्पा २ ब चे काम वेगात सुरु आहे. काम बऱ्यापैकी सुरु झाले आहे.

उर्वरित काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करत या मार्गिकेवरील चाचण्यांना सुरुवात करण्यात येईल. तर त्यानंतर मेट्रो आयुक्त,मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. सीएमआरएसच्या चाचण्या यशस्वी होऊन सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले की हा टप्पाही वाहतूक सेवेत दाखल होईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानुसार ऑगस्टअखेरीस टप्पा २ ब वाहतूक सेवेत दाखल करण्याचे आमचे नियोजन असल्याचे एमएमआरसीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टप्पा २ ब वाहतूक सेवेत दाखल झाल्यास आरे ते कफ परेड अशी संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल आणि काही मिनिटांत आरेवरुन थेट कफ परेडला पोहचणे मुंबईकरांना शक्य होणार आहे. तर ही संपूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास या मार्गिकेला मिळणार प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षाही यानिमित्ताने अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.