मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ मार्गिका ९ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने आरे – कफ परेड दरम्यान धावू लागली आहे. त्यामुळे आरे – कफ परेड दरम्यानचा प्रवास प्रवाशांना तासाभरात करणे शक्य होऊ लागले आहे. तर चर्चगेट, सीएसएमटी, विधान भवन येथे जाणे सोपे झाल्याने या मार्गिकेला मुंबईकरांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र या मार्गिकेत मोबाइल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातही ई तिकीट काढणे अडचणीचे झाले आहे.
ही बाब लक्षात घेत अखेर मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) प्रवाशांची ही अडचण दूर केली आहे. ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील सर्व मेट्रो स्थानकांवर आता मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ई तिकीट घेणे सोपे होणार आहे.
एमएमआरसीच्या ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये, तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आचार्य अत्रे चौक – कफ परेड हा शेवटचा टप्पा ९ सप्टेंबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला असून आता ‘मेट्रो ३’ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. आरे – आचार्य अत्रे चौक मार्गिकेवरून दिवसाला ७० हजार प्रवासी प्रवास करीत होते. पण आता संपूर्ण ‘मेट्रो ३’ मार्गिका सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. आता दिवसाला दीड लाखांहून अधिक प्रवासी ‘मेट्रो ३’ने प्रवास करीत आहेत.
मात्र या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ती म्हणजे मोबाइल नेटवर्कचा अभाव. मोबाइल कंपन्या आणि एमएमआरसीच्या वादात या मार्गिकेत मोबाइल नेटवर्क उपलब्ध करणे एमएमआरसीला अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना मोबाइलचा वापर करता येत नव्हता. मोबाइवरून कार्यालयीन कामेही करता येत नव्हती. त्यातही महत्त्वाचे म्हणजे ई तिकीट उपलब्ध करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे एमएमआरसीने ही समस्या दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. दरम्यान, या समस्येचा प्रवाशी संख्येवरही परिणाम होत असल्याने अखेर एमएमआरसीने मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मेट्रो कनेक्ट ३ या मोबाइल ॲपवरून ई तिकीट काढणे सोप व्हावे यासाठी ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील सर्व स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वायफाय उपलब्ध करण्यासाठी प्रवाशांना MetroConnect3 ॲप डाउनलोड करून स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी लाॅगिन करावे लागेल. त्यानंतर मोबाइलच्या वायफाय सेटिंग्जमध्ये जाऊन उपलब्ध नेटवर्कमधून “MetroConnect3” हा पर्याय निवडावा लागेल. तर ॲप उघडून प्रोफाईलमध्ये जाऊन कनेक्ट टू वायफायवर टॅप करावे लागेल. त्यानंतर प्रवाशांना ई तिकीट खरेदी करता येणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पण लवकरात लवकर संपूर्ण मार्गिकेवर मोबाइल नेटवर्क उपलब्ध करणे एमएमआरसीसाठी आवश्यक असणार आहे. प्रवासात ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. तशी मागणी प्रवाशांची आहे. तेव्हा एमएमआरसीला यात कधी यश मिळते हे पाहणे महत्त्वाचे आहे.