मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिका ९ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने, आरे – कफ परेडदरम्यान धावू लागली आहे. या मार्गिकेवरील आरे – आचार्य अत्रे चौक टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण ‘मेट्रो ३’ पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर मात्र दैनंदिन प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज दीड लाखांहून अधिक प्रवासी ‘मेट्रो ३’मधून प्रवास करीत आहेत. केवळ आठवड्याभरात या मार्गिकेवरून दहा लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण केले आहे. ही मार्गिका तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली आहे. आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये, बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा मे २०२५ मध्ये, तर आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्पा ९ ऑक्टोबर २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. देशातील पहिली सर्वाधिक लांबीची भुयारी मेट्रो मार्गिका अशी या मार्गिकेची ओळख असली आणि या मार्गिकेवरून अनेक ठिकाणी अवघ्या काही मिनिटात जात येत असले तरी आरे – आचार्य अत्रे चौकदरम्यानच्या टप्प्यात प्रतिसाद मिळत नव्हता. आरे – बीकेसी टप्पा सेवेत दाखल होता, त्यावेळी या मार्गिकेवरून दिवसाला अंदाजे २० हजार प्रवासी प्रवास करीत होते. या मार्गिकेवरून प्रतिदिन चार लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा होती. तर आरे – आचार्य अत्रे चौक मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर या मार्गिकेवरील अपेक्षित प्रवासी संख्या साडेसात लाख होती. पण प्रत्यक्षात मात्र दैनंदिन प्रवासी संख्या अंदाजे ७० हजार होती. मेट्रो स्थानकावरून बाहेर पडल्याने इच्छितस्थळी पोहचण्यासाठी रिक्षा, टॅक्सी, बसची करावी लागणारी प्रतीक्षा, स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी करावी लागणारी पायपीट, मार्गिकेत मोबाइलला मिळत नसलेले नेटवर्क आदी विविध कारणांमुळे मुंबईकरांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता मात्र हळूहळू प्रवासी संख्या वाढू लागली आहे.

आरे – कफ परेड दरम्यान पूर्ण क्षमतेने ‘मेट्रो ३’ धावू लागली असून कफ परेड, विधान भवन, सीएसएमटी, चर्चगेट, गिरगाव, काळबादेवी या ठिकाणांना मेट्रो जोडली गेली आहे. उपनगरातून दक्षिण मुंबईत काही मिनिटात पोहचणे शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे आता मुंबईकर हळूहळू का होईना पण ‘मेट्रो ३’ला पसंती देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच आता दैनंदिन प्रवासी संख्या ७० हजारांहून थेट दीड लाखांच्यावर गेली आहे. एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार ९ ते १६ ऑक्टोबरदरम्यान या मार्गिकेवरून दहा लाख प्रवाशांनी प्रवास केला. ९ ऑक्टोबरला १ लाख ५६ जार ४५६ प्रवाशांनी, १३ ऑक्टोबरला १ लाख ६४ हजार ८७७ प्रवाशांनी, १४ आक्टोबरला १ लाख ७६ हजार १९७ प्रवाशांनी, तर १५ ऑक्टोबरला १ लाख ८२ हजार १९७ प्रवाशांनी ‘मेट्र ३’मधून प्रवास केला. येत्या काळात प्रतिसाद आणखी वाढेल आणि दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाखांचा टप्पा पार करून पुढे जाईल, असा विश्वास एमएमआरसीन व्यक्त केला आहे.