मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने दीड लाख गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितेची मोहीम हाती घेतली आहे. दोन वर्षांत दीड लाख गिरणी कामगारांपैकी केवळ १ लाख ८ हजार ४१६ गिरणी कामगारांनीच मंडळाकडे अर्ज सादर केले. यापैकी ९९ लाख ५७५ गिरणी कामगार आतापर्यंत पात्र ठरले आहेत. मात्र जवळपास ४१ हजार गिरणी कामगारांनी अद्याप अर्ज सादर केलेले नाहीत. त्यामुळे या कामगारांच्या अर्जाची मंडळाला प्रतीक्षा आहे.

गिरण्यांच्या जागेवरील घरांच्या योजनेसाठी राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांकडून अर्ज भरून घेतले होते. त्यानुसार दोन टप्प्यात पावणेदोन लाख गिरणी कामगार आणि वारसांनी अर्ज भरले होते. यातील अंदाजे २५ हजार गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न म्हाडाला पूर्ण करता आले. तर दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. या कामगारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र यादरम्यान दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती पूर्ण करून सोडत झाल्यानंतर त्यांना तात्काळ घराचा ताबा देता यावे यासाठी पात्रता निश्चितीची मोहीम हाती घेण्यात आली.

कामगारांकडून त्यांची सर्व कागदपत्रे जमा करून घेत कामगार विभागाच्या माध्यमातून पात्रता निश्चिती पूर्ण केली जात आहे. या मोहिमेला सप्टेंबर २०२३ मध्ये सुरुवात झाली. या मोहिमेला दोन वर्षे पूर्ण झाली असून या दोन वर्षांत एक लाख ८ हजार ४१६ गिरणी कामगारांनी अर्ज सादर केले आहेत. यापैकी लाखभर गिरणी कामगार पात्र ठरल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शनिवारी म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीदरम्यान दिली.

गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारचे धोरण लवचिक असल्याने दोन वर्षांनंतरही ही मोहिम बंद करण्यात आलेली नाही. जसे जसे कामगार येतात तसे तसे त्यांच्याकडून अर्ज सादर करून घेतले जात आहेत. मात्र मागील सहा महिन्यांपासून गिरणी कामगारांकडून कागदपत्र सादर करून अर्ज करण्याचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतके असल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. आजही अंदाजे ४१ हजार गिरणी कामगारांनी कागदपत्रांसह अर्ज सादर केलेला नाही. त्यामुळे अजूनही मुंबई मंडळाला ४१ गिरणी कामगारांच्या अर्जांची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर ज्या गिरणी कामगारांनी वा त्यांच्या वारसांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून पात्रता निश्चिती करून घ्यावी आणि गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे.