मुंबई : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच मुंबईमधील अंधेरी परिसरातील डी. एन. नगर येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान जलवाहिन्यांवर दाब आल्यामुळे होत असलेल्या गळतीमुळे रस्ता खचण्याची भिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नऊ इमारतींचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवात नऊ इमारतींमधील तब्बल ३६० कुटुंबियांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुंबई महानगरपालिका या रहिवाशांना टँकरने पाणीपुरठा करीत आहे. मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांना वणवण करावी लागत आहे.
अंधेरीमधील डी. एन. नगरमध्ये म्हाडाच्या इमारती आहेत. म्हाडाच्या इमारतींना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. म्हाडाच्या हद्दीतील जलवाहिन्यांना महापालिकेच्या जलवाहिन्यांची जोडणी करण्यात आली आहे. पुढे म्हाडाच्या जलवाहिन्यांमधून सदर इमारतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. डी. एन. नगरमधील एका इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. इमारतीच्या पुनर्विकासासाठी पाया खोदण्यात आला असून त्या खड्ड्यात सतत मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. पाणी नेमके कुठून येते याचा उलगडा होत नव्हता. दरम्यानच्या काळात तेथील इमारत क्रमांक ४२ आणि ४१ दरम्यानची जलवाहिनी १५ दिवसांपूर्वी फुटली आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे लक्षात आले.
जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने इमारत क्रमांक ४१ चा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यावेळी रस्त्याखालील जलवाहिनीतून गळती होत असल्याचे लक्षात आले. या गळतीची दुरुस्ती करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी येथील महात्मा फुले क्रीडांगणाच्या बाजूच्या शशिकांत सावंत मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याखालून गेलेल्या सेवा उपयोगिता वाहिन्या, जलवाहिन्यांची कामे योग्य प्रकारे झाली नाहीत. त्याच वेळी जलवाहिन्यांची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. उलटपक्षी म्हाडाच्या जलवाहिन्या दबल्या गेल्या आणि त्यातून गळती होऊ लागल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणार पाणी गळती होऊन जमीन खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या डी. एन. नगरमधील इमारत क्रमांक ३३, ३४ (पोलीस वसाहत), ३६, ३७, ३८, ३९, ४२, ४२ आणि ४६ यांचा पाणीपुरवठा खंडीत करावा लागला आहे. प्रत्येक इमारतीत साधारण ४० कुटुंबे वास्तव्यास असून आठ इमारतींचा पाणीपुरवठा गेल्या सात दिवसांपासून तर इमारत क्रमांक ४१ चा पाणीपुरवठा गेल्या १५ दिवसांपासून खंडीत आहे. ऐन गणेशोत्सवात पाणीपुरवठा खंडीत झाल्याने तब्बल ३६० कुटुंबे त्रस्त आहेत.
जलवाहिनीतून सतत होणाऱ्या गळतीमुळे रस्त्याखालील माती सरकून पोकळी निर्माण झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे म्हाडा अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. महापालिकेने काँक्रीटीकरण केलेला रस्ता पुन्हा खोदावा लागणार असून त्या खालून गेलेल्या जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिका आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी परिसराची पाहणी केली असून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या नऊ इमारतींमधील रहिवाशांना टँकरमधील पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.
डी. एन. नगरमधील म्हाडाच्या अखत्यारितील जलवाहिनीतून गळती होत होती. गळती होत असल्याने म्हाडाने पाणीपुरवठा बंद केला आहे. मुंबई महापालिकेतर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. म्हाडा लवकरच दुरुस्तीचे काम करून सदर इमारतींचा पाणीपुरवठा सुरळीत करेल. – चक्रपाणी अल्ले सहाय्यक आयुक्त, के-पश्चिम
मुंबई महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त, रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता आणि आपण समन्वयाने जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्याची परवानगी मिळाली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरात लवकर काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे म्हाडाच्या वांद्रे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ सांगितले.