मुंबई : क्रॉफर्ड मार्केटमधील लोकमान्य टिळक मार्गावरील एका दुकानात सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, दुकानातील सामान जळून खाक झाल्याने मोठी वित्तहानी झाली.

क्रॉफर्ड मार्केट येथील दुकानाला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, तातडीने मदतकार्य हाती घेत आगीत कोणीही अडकल्याचे नसल्याचे खात्री करून घेतली. सुमारे १५ बाय ५० चौरस फूट जागेत आग पसरली होती. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने रात्री २.२८ च्या सुमारास आगीला क्रमांक एकची वर्दी दिली.

रात्रीचा काळोख आणि आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अडचणी येत होत्या. आग विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले होते. या आगीत दुकानातील एलईडी दूरचित्रवाणी संच, पंखा, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, लाकडी तसेच प्लास्टिकचे सामान, पेडिग्रीचा साठा व अन्य सामान जळून खाक झाले. अखेर पहाटे ५ वाजता अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.