मुंबई: गोराई समुद्रकिनाऱ्यावरून जाणारी एक मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. बस चालकाने गाडीतून बाहेर पडत कशीबशी आपली सुटका केली. मात्र मिनी बस मात्र पाण्यातच अडकली. अखेर स्थानिकांच्या मदतीने दोन तासांच्या प्रयत्नानंतर बस बाहेर काढण्यात आली.
शहरातील समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना जाण्यास परवानगी नसते. मात्र अनेक वाहनचालक समुद्रकिनाऱ्यावर आपली वाहने घेऊन जात असतात. त्यामुळे अनेकदा वाळूत चाक रूतून किंवा भरतीच्या पाण्यात वाहने अडकत असतात. गोराई हा मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात. त्यामुळे हा समुद्रकिनारा नेहमी गजबजलेला असतो.
मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
या समुद्रकिनाऱ्यालगत अनेक निवासी बंगले आहेत. यातील काही बंगल्यांना मागील बाजूने समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. या बंगल्यांमध्ये सोमवारी सकाळी काही लोकांना सोडण्यासाठी मिनी बस नेली होती. सकाळी १० च्या सुमारास चालका परत येत होता. मुख्य रस्त्याने न येताना तो समुद्रकिनार्यावरून येत होता. मात्र त्याच वेळी वाळूत बसचे चाक रुतले. त्यानंतर समुद्राला भरती आली आणि मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली. बस चालकाने बाहेर पडून कशीबशी आपली सुटका केली.
चालकाने स्थानिकांची मदत मागितली. स्थानिका नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडी दोरखंडाने बांधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दोन तास हा प्रकार सुरू होता. बस समुद्रात अडकल्याची चित्रफित सध्या समाजमाध्यमावर वायरल झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आम्ही चालकाला चौकशीसाठी बोलावले असून त्याच्याविरुद्ध जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १२५ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती गोराई पोलिसांनी दिली.
यापूर्वीची घटना…
समुद्रकिनाऱ्यावर गाडी नेल्याने ती अडकून पडल्याची अशीच एक घटना जुलै महिन्यात घडली होती. तीन तरुण १३ जुलै रोजी रात्री मुंबईतील जुहू समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. मद्याच्या नशेत त्यांनी गाडी थेट समुद्रातच नेली. मात्र त्यांची गाडी वाळूत अडकली. हा प्रकार गस्तीवर असेलेल्या पोलिसांनी पाहिला. नंतर अग्निशमन दलाच्या मदतीने ट्रॅक्टर आणून वाळूत अडकलेले वाहन काढण्यात आले. त्यासाठी पोलिसांना दोन तास लागले. या तरुणांवर मोटार वाहन कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.