मुंबई : चेंबूर येथील वत्सलाताई नाईक नगरमधील हॉटेल ईस्टर्न प्लाझामध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवून जमीनदोस्त केले. नेहरू नगर पोलीस ठाण्याने दिलेल्या कडेकोट बंदोबस्तात महानगरपालिकेच्या एम-पश्चिम विभाग कार्यालयाने ही तोडक कारवाई केली.

पूर्व द्रुतगती मार्गाजवळील वत्सलाताई नाईक नगरमधील दुमजली ईस्टर्न प्लाझा हॉटेलमध्ये कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता एसी शीट फूफ, बीएम वॉल, लादी कोबा स्लॅबचा वापर करून १४ फुटांहून अधिक उंचीचे अनधिकृत लॉजचे बांधकाम करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील अग्निशमनविषयक उपाययोजनांची पाहणी केल्यानंतर हॉटेल मालकावर नोटीस बजावली होती. त्यानुसार महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली. हॉटेल ईस्टर्न प्लाझा इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सुमारे ८० टक्के बांधकाम पाडण्यात आले. सायंकाळी काळोखामुळे थांबवण्यात आलेली उर्वरित कारवाई ३० नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आली.

हेही वाचा – नाशिक : सिन्नरमधील अपहृत युवकाची सहा तासांत सुटका

हेही वाचा – जात पंचायतीच्या मनमानीविरोधात आता मदतवाहिनी, महाराष्ट्र अंनिसच्या मूठमाती अभियानाचा पुढाकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि सहायक आयुक्त (‘एम’ पश्चिम विभाग) विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ‘एम’ पश्चिम विभागातील कामगार आणि अधिकारी मिळून ३० मनुष्यबळ, तसेच अन्य आवश्यक संसाधनांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. नेहरू नगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.