मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बॅंंकेच्या निवडणुकीचा वाद न्यायालयात पोहोचला असून या प्रकरणी आता सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणी जय सहकार पॅनेलने को – ऑपरेटीव्ह न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी पार पडली. पहिली सुनावणी ९ सप्टेंबर रोजी पार पडली असून न्यायालयाने सर्व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. आता न्यायालयाने १ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याची बॅंक असलेल्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक २१ ऑगस्टला पार पडली. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीनंतर या निवडणुकीलाही महत्त्व आले होते. तब्बल ६० हजारांहून अधिक सभासद असलेल्या या बॅंकेच्या निवडणुकीला यंदा कामगारांसह अधिकारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. एकूण ४८ टक्के मतदान झाले होते.
यंदाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचेही पॅनेल उतरले होते. तर विद्यामान संचालक मंडळापैकी एक असलेल्या विष्णू घुमरे यांचे एक पॅनेल होते. तर आणखी एक संचालक भानुदास भोईर यांचेही एक पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात होते. तर सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलने निवडणुकीआधीच माघार घेतली होती. सदावर्ते यांच्या पॅनेलमधील चार उमेदवारांनी घुमरे यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीसाठी विष्णू घुमरे यांचे जय सहकार पॅनेल, भानुदार भोईर यांचे सहकार पॅनेल, बच्चू कडू यांचे जय महाराष्ट्र सहकार पॅनेल, समता पॅनेल, स्वराज्य पॅनेल आणि बीएमसी सहकार पॅनेल अशी सहा पॅनेल होती. तसेच एकूण १५३ उमेदवार रिंगणात होते.
निवडणुकीची मतमोजणी २२ ऑगस्ट रोजी कॉटनग्रीन येथे रात्री उशीरापर्यंत सुरू होती. मध्यरात्री या मतमोजणीवर बहुतांशी उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मतमोजणी काही काळ थांबवावी लागली होती. पहाटे या मतमोजणीत भानुदार भोईर यांचे सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. तर जय सहकार पॅनेलचे पाच उमेदवार विजयी झाले होते. मात्र जय सहकार पॅनेलने या मतमोजणीवर आक्षेप घेतला असून याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तसेच जय सहकार पॅनेलने को – ऑपरेटिव्ह न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मंगळवारी पहिली सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच या निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांचे म्हणणेही ऐकून घेतले. त्यांचे अर्जही यावेळी स्वीकारण्यात आले.
या मतमोजणीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप घुमरे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार केली आहे. उमेदवारांच्या आक्षेपांची दखल न घेता निकाल जाहीर करण्यात आल्याचा आरोप घुमरे यांनी केला आहे. मतमोजणी पुन्हा घ्यावी किंवा निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मतमोजणीच्या वेळी अनेक टेबलांवर मते वाढवून दिली जात होती.
याबाबतचे पुरावेही सादर केले असून उच्चस्तरीय चौकशी करून विनाविलंब न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी ९ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत सर्व उमेदवारांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. तर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शासनाचे वकिल, बॅंकेचे वकील यांना पुढील सुनावणीच्या वेळी आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी १ ऑक्टोबरची तारीख देण्यात आल्याची माहिती घुमरे यांनी दिली.