मुंबई : सांताक्रुझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयातील अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याच्या प्रकरणाची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने या रुग्णालयासह अन्य तीन रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या कंत्राटाला कोणतीही मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या कंत्राटदारामार्फत चार रुग्णालयात पुरविण्यात येणारी सेवा ३० ऑगस्टपासून बंद करण्यात आली असून मुंबई महानगरपालिकेकडून नवीन कंत्राट काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (कांदिवली शताब्दी) १५ खाटांचा अतिदक्षता विभाग व १५ खाटांचा शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. व्ही. एन .देसाई रुग्णालयात १० खाटांचा अतिदक्षता विभाग, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात १२ खाटांचा आणि क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात १० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे.
या चारही रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात डॉक्टरांची सेवा पुरविण्याचे कंत्राट हे साई संजीवनी या कंपनीकडे होते. मात्र काही दिवसांपूर्वी या कंपनीकडून व्ही. एन. देसाई रुग्णालयात बोगस डॉक्टरची सेवा पुरविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. यासंदर्भात महानगरपालिकेने बोगस डॉक्टर व कंत्राटदाराविरोधात कोणतीही तक्रार पोलिसांकडे केली नाही. मात्र या चारही रुग्णालयातील कंत्राटाला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेऊन त्याची सेवा ३० ऑगस्टपासून बंद केली आहे.
यासंदर्भातील नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्णालयांना डीएनबी शिक्षक, डीएनबी विद्यार्थी, बंधपत्रित वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी अशा स्वत:च्या डॉक्टरांचा वापर करून अतिदक्षता विभाग चालविण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदाराच्या सेवेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय अचानक घेतल्याने अतिदक्षता विभागावर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र कंत्राटदाराला केलेल्या विनंतीनंतर त्याने पुढील १० दिवस सेवा पुरविण्यासाठी संमती दर्शवली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील सेवा सुरळीत असल्याचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.
कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ अतिदक्षता विभागात सेवा पुरविणाऱ्या साई संजीवनी कंपनीचे कंत्राट २८ सप्टेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आले होते. त्यानंतर या कंपनीला सलग दोन वेळा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार पहिली मुदतवाढ २९ मार्च २०२५ पर्यंत तर दुसरी मुदतवाढ २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत देण्यात आली होती. कांदिवली शताब्दी रुग्णालयाकडून घाईघाईने पद भरतीसाठी जाहिरात अतिदक्षता विभाागाचे कंत्राटाला मुदतवाढ न देण्याच्या निर्णयानंतर कांदिवली शताब्दी रुग्णालयाने घाईघाईने २६ ऑगस्ट रोजी ८ पदे भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये तीन डीएनबी वैद्यकीय, २ डीएनबी शस्त्रक्रिया शिक्षक, १ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, २ डीएनबी ऍनेस्थेशिया शिक्षक यांचा समावेश आहे.