मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे बेस्टच्या कामगारांच्या प्रश्नासाठी सर्वच कामगार संघटना सरसावल्या आहेत. गेल्या आठवड्यात कामगार नेते शशांक राव यांच्या संघटनेचे आंदोलन पार पडल्यानंतर आता खासदार नारायण राणे यांच्या संघटनेनेही कामगारांच्या प्रश्नासाठी बेस्टच्या मुख्यालयावर धडक देण्याचे ठरवले आहे. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या (ठाकरे) कामगार सेनेनेही बैठक घेऊन बेस्ट कामगारांच्या प्रश्नाबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याकरीता पदाधिकांऱ्यासोबत चर्चा केली.
बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्या कायमस्वरूपी राखाव्यात, बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची थकित रक्कम तातडीने द्यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी व महापालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला प्रलंबित वेतनकरार तातडीने करावा, बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा आदी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांना अचानक निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महत्त्व आले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार असून या निवडणुकीत बेस्टच्या कामगारांची नाराजी कोणत्याही पक्षाला परवडणारी नाही. तसेच या निमित्ताने प्रश्न सोडवल्याचे श्रेय घेण्याचाही प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करू लागले आहेत.
गेल्याच आठवड्यात कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आपल्या कार्यालयातच बेमुदत उपोषण केले. महाव्यवस्थापकांसोबत बैठक पार पडल्यानंतर यासंदर्भात सातत्याने चर्चा करून तीन महिन्यांत सर्व मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ठरले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यांचे आंदोलन संपते न संपते तोच आता खासदार नारायण राणे यांच्या समर्थ बेस्ट कामगार संघटनेनेही ‘चलो कुलाबा आगार’ असा इशारा दिला आहे. महाव्यवस्थापकांची बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी कुलाबा आगार येथे भेट घेण्यात येणार आहे. त्याकरीता कामगारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही सरचिटणीस विलास पवार यांनी केले. शशांक राव सध्या भाजपमध्ये आहेत. तर नारायण राणे हेही भाजपमध्ये आहेत. सत्ताधारी पक्षात असूनही या दोन्ही संघटनांना कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ येते याबाबत बेस्टच्या कामगारांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, बेस्ट कामगार सेनेनेही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेण्याचे ठरवले असून गेल्या आठवड्यात बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात एक बैठक पार पडली. त्यात यापुढे कर्मचाऱ्यांशी व कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पालिका आयुक्त, मुख्यमंत्री व महाव्यवस्थापक यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
