मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पदोन्नतीबाबत असंतोषाचे वातावरण आहे. कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवून दुय्यम अभियंता पदे बाहेरून सरळ सेवेने भरली जाणार आहेत. सरळ सेवेने भरण्याची केवळ ६८ पदे रिक्त असताना प्रत्यक्षात मुंबई महापालिकेने २३३ पदांसाठी जाहिरात दिली आहे. त्यामुळे हे गौडबंगाल काय आहे असा सवाल बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने केला आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी जून महिन्यात मुंबई महापालिका प्रशासनाने जाहिरात दिली होती. मात्र प्रत्यक्षात रिक्त पदांपेक्षा जास्त पदांसाठीची जाहिरात दिल्याचे उघडकीस आले आहे. दुय्यम अभियंत्यांची ५० टक्के पदे कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देऊन, तर ५० टक्के पदे सरळसेवेने बाहेरून भरती करण्यात येणार आहे. मात्र बाहेरून भरण्यासाठी रिक्त पदांपेक्षा अधिक पदांसाठी मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता विभागाने जाहिरात दिल्याचे उघडकीस आले आहे. तसेच कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवून दुसऱ्या बाजूला बाहेरून पदे भरण्याची तयारी सुरू केल्यामुळे अभियंता वर्गात असंतोष पसरला आहे. तसेच संभ्रमाचे व संशयाचे वातावरण आहे.

५० टक्के पदे बाहेरून भरती

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनने यासंदर्भात मुंबई महापालिका प्रशासनाकडे माहिती अधिकारात माहिती विचारली असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत संघटनेचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता ( स्थापत्य )पदाची एकूण १६५८ पदे आहेत. त्यापैकी ५० टक्के पदे म्हणजे ८२९ पदे ही सरळ सेवेने बाहेरील पदवीधर अभियंत्यांना नियुक्ती देऊन भरली जातात. तर उर्वरित ५० टक्के पदे पालिका सेवेत असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार दुय्यम अभियंता पदावर पदोन्नती देऊन भरली जातात. तर दुय्यम अभियंत्यांची (यांत्रिकी व विद्युत) एकूण ५४० पदे असून यातील ५० टक्के पदे म्हणजे २७० पदे सरळ सेवेने यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी पदवीधर अभियंत्यांना नियुक्ती देऊन भरली जातात. तर उर्वरित ५० टक्के म्हणजे २७० पदे ही पालिकेच्या सेवेत असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांना (यांत्रिकी व विद्युत) सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देऊन भरली जातात.

रिक्त पदांपेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात

पदवीधर दुय्यम अभियंता स्थापत्य पदाची सरळ सेवेने नियुक्त करावयाची प्रत्यक्षात रिक्त पदे केवळ ६८ असून महापालिकेने २३३ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. यावर इंजिनीअर्स युनियने आक्षेप घेतला आहे. तसेच दुय्यम अभियंता यां व विद्युत पदाची सरळ सेवेने नियुक्त करावयाची २७० पदे आहेत, त्यातील २२५ पदे भरलेली असून फक्त ४५ रिक्त पदे भरावयाची असताना ७७ पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. हा प्रकार चुकीचा आहे, असे धुरी म्हणाले.

पदोन्नतीची पदे रिक्त

पालिका सेवेत असलेले कनिष्ठ अभियंताच्या पदोन्नतीची ३०७ दुय्यम अभियंता ( स्थापत्य) पदे आणि १३२ दुय्यम अभियंता ( यां व वि. ) पदे रिक्त ठेवून सेवेतील कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. बाहेरील भरतीपूर्वी मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांना तातडीने पदोन्नती द्यावी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करावे , अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिला आहे.