मुंबई : पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेने यावेळीही निविदा मागवल्या आहेत. यंदा मुंबईतील सात परिमंडळातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एकूण ७९ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. तर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे २५ कोटीं रुपये खर्च अपेक्षित आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी एकूण १०४ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.

मुंबईत आतापर्यंत १२०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. सध्या मुंबईत एकाच वेळी ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे मुंबईत वेगात सुरू आहेत. कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महापालिकेला सुमारे दीडशे किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डेच बुजवावे लागणार आहेत.

पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी मागविलेल्या परिमंडळनिहाय निविदांनुसार खड्डे बुजवण्याचा अंदाजित खर्च ७९ कोटी रुपये इतका आहे. गेल्यावर्षी खड्डे बुजविण्यासाठी १५५ कोटी रुपये खर्च झाले होते. यावेळी अंदाजित खर्चात सुमारे ५१ टक्के कपात करण्यात आली आहे. मात्र कंत्राटदारांच्या प्रतिसादावर हा खर्च अवलंबून असेल.

परिमंडळनिहाय खर्च

● परिमंडळ १ – चर्चगेट, कुलाबा – ८ कोटी ७८ लाख

● परिमंडळ २ – परळ, वरळी, प्रभादेवी, दादर – १२ कोटी ६३ लाख

● परिमंडळ ३ – वांद्रे पूर्व, पश्चिम, अंधेरी ते जोगेश्वरी पूर्व – १० कोटी ४७ लाख

● परिमंडळ ४ – अंधेरी ते जोगेश्वरी पश्चिम आणि पूर्व भाग, गोरेगाव, मालाड – १३ कोटी ५४ लाख

● परिमंडळ ५ – कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द – २ कोटी ७३ कोटी

● परिमंडळ ६ – घाटकोपर, भांडूप, मुलुंड – १० कोटी ३८ लाख

● परिमंडळ ७ – दहिसर ते कांदिवली – १० कोटी ४७ लाख

मास्टिक अस्फाल्टचाच वापर

मुंबई महापालिकेने यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स, कोल्ड मिक्स, जिओ पॉलिमर अशा विविध पर्यायांची चाचपणी केली होती. यंदा मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच मास्टिक अस्फाल्ट म्हणजेच डांबरानेच खड्डे बुजवले जाणार आहेत. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यात ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते, आणि ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते असे दोन प्रकार लक्षात घेऊन निविदा मागवण्यात आल्या आहेत.

अंदाजित खर्च

● नऊ मीटरपेक्षा अधिक रुंद रस्ते – ४९ कोटी

● नऊ मीटरपेक्षा कमी रुंद रस्ते – २७ कोटी

● सहा मीटरपेक्षा लहान रस्ते – ३ कोटी

● पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग – २५ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● एकूण – १०४ कोटी