मुंबई : पावसाळा जवळ आल्यामुळे मुंबईमध्ये सध्या युद्धपातळीवर नालेसफाई करण्यात येत असून नालेसफाईच्या कामावर बारीक लक्ष ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाने महानगरपालिका मुख्यालयात ‘वॉर रुम’ सुरू केली आहे. या ‘वॉर रुम’मधून दररोज सकाळी ८ ते रात्री १ दरम्यान नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी या वॉर रुममध्ये पथक तैनात करण्यात आले आहे.

मुंबईतील लहान – मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. नालेसफाईच्या कामात भ्रष्ठाचार होऊ नये म्हणून पालिकेने कंत्राटात विशिष्ट अटी समाविष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर ही कामे योग्यरित्या होत आहेत की नाही हे पाहण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात ‘वॉर रुम’ सज्ज केली आहे. दररोज सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान दोन सत्रांमध्ये या ‘वॉर रुम’मधून महानगरपालिका प्रशासनाचे गाळ काढण्याच्या कामावर लक्ष असणार आहे. त्यासाठी या वॉर रुममध्ये एका अभियंत्यासह तीन जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या ‘वॉर रुम’ला नुकतीच भेट दिली.

चित्रीकरण बंधनकारक

नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी प्रशासनाने छायाचित्रण आणि ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसी टीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही सर्व छायाचित्रे आणि चित्रफित (व्हिडिओ) या ‘वॉर रुम’मध्ये थेट दिसणार आहेत.

असा होणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial intelligence) वापर

  • संपूर्ण नाले स्वच्छतेच्या कालावधीत साधारणत: ७ हजार मिनिटांचे चलचित्र अपलोड केले जाणे अपेक्षित आहे. या सर्व चित्रफितींची पाहणी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केली जाईल. या चित्रफितींमध्ये त्रुटी किंवा सर्वसामान्य गोष्टींपेक्षा काही वेगळे आढळले तर या प्रणालीकडून अशा चित्रफिती निवडून ते वेगळे काढण्यात येतील व त्याबाबत सतर्क केले जाईल. अशी चित्रफित या प्रणालीने तपासल्यानंतर पथकाकडून (manually) आणि प्रत्यक्ष (physically) देखील तपासली जातील.
  • वजन काट्यांवर जेव्हा वाहन येते तेव्हा त्या वाहनावरील ताडपत्री काढणे अपेक्षित आहे. जर वाहनावरील ताडपत्री काढलेली नसेल, तर प्रणाली स्वत:हून त्याबाबीची नोंद घेईल व अशा वाहनांच्या वजनाची पावती तयार होणार नाही.
  • चित्रफित अपलोड केली जात असताना कोणी चुकीच्या पद्धतीने ती अपलोड केली किंवा चित्रफितीमध्ये काही त्रुटी आढळली तर अशी बाब शोधण्यासाठी या प्रणालीला प्रशिक्षित करण्यात आले आहे.
  • सर्व प्रमुख नाले आणि मिठी नदी भू-स्थानिक संदर्भित (georeferenced) केलेले आहेत. यामुळे गाळ भरण्यासाठी नेमलेले वाहन फेरी सुरू झाल्यापासून फेरी संपेपर्यंत नाल्याचा परिसर, वजन काटा आणि गाळ टाकण्याचे ठिकाण याव्यतिरिक्त जर इतरत्र कुठे आढळले तर या प्रणालीद्वारे शोधण्यात येणार आहे.
  • एखाद्या वाहनात सामान्यत: आढळून येणाऱ्या वजनापेक्षा जर अतिरिक्त वजन आढळले तर ते सुद्धा या प्रणालीमार्फत शोधून दिले जाणार आहे. त्यानंतर अशा वाहनांची पुढील तपासणी केली जावू शकते.

चॅट जिपिटीचाही वापर

  • नाला स्वच्छतेत एलएलएम (Large Language Model- उदा. चॅट जीपीटी, लामा इत्यादीचा वापरही करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वर नमूद वैशिष्ट्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डेटा (विदा) तयार होणार आहे. या डेटाचे (विदा) विश्लेषण एलएलएमच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे माहितीविषयक चिकित्सा व त्याद्वारे अनुमान (Data Analytics) अधिक सोपे होणार आहे.