मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा ऑगस्ट महिन्यात जाहीर झाला असून त्यावर ४८८ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असल्यामुळे २०१७ च्या निवडणूकीच्यावेळी जशी प्रभाग रचना होती त्यात यंदा फारसे बदल झालेले नाहीत. तरीही हरकती व सूचनांचा मात्र पाऊस पडला आहे. पुढील आठवड्यात तीन दिवस सुनावणी होणार आहे.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणूकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री जाहीर केला. या प्रारुप आराखड्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मुंबई महापालिकेकडे ४८८ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या.

महापालिकेची मुदत मार्च २०२२ ला संपली तेव्हापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. गेली तीन वर्षे विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार या निवडणूकीच्या घोषणेकडे लक्ष लावून बसले होते. प्रभाग पुनर्रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर झाल्यामुळे एक प्रकारे निवडणूकीचे बिगुल वाजल्यासारखे झाले आहे. मात्र ऐन गणेशोत्सवात हरकती व सूचनांसाठी अवघ्या दहा पंधरा दिवसांची मुदत दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी होती. तरीही ४८८ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, २०२२ मध्ये जेव्हा राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हा प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली होती. त्यावेळी एकूण ८९२ हरकती व सूचना आल्या होत्या. त्या तुलनेत यंदा हरकती व सूचनांची संख्या कमी आहेत.

तीन दिवस होणार सुनावणी

महापालिकेकडे प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर १०, ११ आणि १२ सप्टेंबर या तीन दिवसांत महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित केले आहेत. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावावरील प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग या ठिकाणी दिनांक १०, ११ आणि १२ सप्टेंबर या तीन दिवसांत सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान सुनावणी घेतली जाणार आहे.

सुनावणीसाठी हरकतदारांनी नेमून दिलेल्या दिवशी वेळेत उपस्थित राहावे. ज्या हरकत/ सूचनादारांना सुनावणी सूचनापत्र मिळाले नसल्यास त्यांनी उप करनिर्धारक व संकलक (निवडणूक), निवडणूक मुख्य कार्यालय, तिसरा मजला, महानगरपालिका विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – ४००००१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यांनी केले आहे.