मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये राजकीय स्पर्धा दिसू लागली आहे. मंडळांच्या प्रवेशद्वारावर राजकीय पक्षांचे, नेत्यांचे जाहिरात फलक दिसू लागले असून त्या त्या मंडळांवर कोणत्या पक्षाचा राजकीय वरदहस्त आहे ते दिसू लागले आहे. जास्तीत जास्त मंडळांच्या प्रवेशद्वारावर आपल्या नेत्यांचे फोटो झळकावेत म्हणून राजकीय पक्षांमध्येही स्पर्धा लागली आहे. मात्र गणेशोत्सवाला राजकारणापासून दूर ठेवा, असे आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी जाहीर केला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. गणेशोत्सवात एकूण राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा असते. ही मंडळे आपल्या पक्षाशी बांधील असावी म्हणून राजकीय नेते त्यांना जाहिराती देत असतात. मंडळाच्या मंडपाबाहेरील राजकीय पक्षांच्या जाहिराती बघितल्या तरी त्यातून या मंडळांला कोणत्या पक्षाचा पाठिंबा आहे किंवा कोणत्या पक्षाला या मंडळाचा पाठिंबा आहे त्याचे अंदाज बांधता येतात. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर होणारी मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असून त्यामुळे शिवसेनेशी सलग्न असलेल्या मंडळांनाही या राजकीय स्पर्धेचा फटका बसत आहे.
मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक मंडळे असून बहुतांशी मंडळांचे सल्लागार राजकीय नेते मंडळी असतात. त्यामुळे ही मंडळे त्या त्या राजकीय नेत्याशी बांधिल असतात. यंदा राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून जाहीर केले. त्यामुळे एकप्रकारे सत्ताधारी महायुतीने आधीच गणेशोत्सव मंडळांना खूष केले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा राजकारणाचा आखाडाच ठरणार आहे. राजकीय पक्षांकडून मिळणाऱ्या जाहिरातीमुळे गणेशोत्सव मंडळांना मोठी आर्थिक मदत होत असते. पण या मदतीच्या जोरावर मंडळे त्या त्या पक्षाला बांधील होत असतात. मात्र गणेशोत्सव मंडळांनी राजकारण दूर ठेवावे असे, आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.
गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे मंडळांमध्ये हे राजकारण आणू नये, असे आवाहन गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. केवळ एकाच पक्षाशी संबंधित नेत्यांना बोलावणे, एकाच पक्षाच्या नेत्यांची भाषणे ठेवणे, एकाच पक्षाचे जाहिरात फलक अशा स्वरुपाचे राजकारण असू नये, असे मत समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.