बनावट कागदपत्रांच्या साह्य़ाने येथील महाराष्ट्र बँकेची तब्बल ५५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक अरिवद शेणॉय यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बँकेच्या उरण शाखेकडून ऐरोली, पनवेल, डोंबिवली आदी ठिकाणचे रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून गौतम डांगे, अमित कैलास सिंग, संतोष ओंकार कोरवे, राकेश रतन सिंग, कृष्णा मोरे व राजीव  सिंग यांनी बँकेला गंडा घातला. या आरोपींनी बोगस कार डीलर तसेच जामीनदारांच्या माध्यमातून कागदपत्रे सादर करून बँकेतून सुमारे ५४ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर आरोपींनी हप्ते भरणे बंद केले.

सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या
वाडा : उत्तरप्रदेशमधून कुडूस येथे आलेल्या एका कामगाराच्या सहा वर्षीय चिमुरडीवर २६ वर्षीय तरुणाने बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. अतुल लोते असे त्याचे नाव असून तो मूळचा अहमदनगर येथील राहणारा आहे. युवराज झा (नाव बदललेले आहे) हे या भागात चायनीजची हातगाडी लावून उदरनिर्वाह करतात. पोल्ट्री फार्मवर काम करणारा अतुल लोते तेथे नियमित येत होता. अतुलची झा यांच्या मुलीबरोबर ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत अरुणने सोमवारी तिला पोल्ट्रीशेजारील जंगलात नेऊन  बलात्कार केला व नंतर  हत्या केली. रात्र झाली तरी मुलगी घरी न आल्याने  झा यांनी शोधाशोध सुरूकेली. पोल्ट्रीमध्ये राहणारा अतुलही बेपत्ता होता. मुलीच्या वडिलांनी कुडूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

रिक्षा ऑनलाइन परवाना लॉटरीची आज सोडत
मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी रिक्षा ऑनलाइन परवाना लॉटरीची सोडत काढली जाणार आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात या सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.  
१ लाख ७५ हजार ३४९ अर्ज दाखल झाले असून यातील १ लाख ५२ हजार ८६५ जणांनी शुल्क भरले आहे. या सोडतीमधून ७० हजार परवाने दिले जाणार आहेत.   http://autopermit.mahaonline.gov.in, http://www.autorickshawlottery.in या संकेतस्थळावर लॉटरीच्या सोडतीचा निकाल पाहायला मिळणार आहे.