मुंबईः शिवाजी पार्क येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मोठी गडबड होणार असल्याचा दूरध्वनी पोलीस नियंत्रण कक्षाला करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अंधेरीतून अटक केली. खोटी माहिती देऊन भीती निर्माण केल्याप्रकरणी आरोपीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूरध्वनी आल्यानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.

कन्नप्पा एस. सोमसुंदर रेड्डी (५२) असे अटक आरोपीचे नाव असून तो अंधेरीतील रहिवासी आहे. शिवाजी पार्क येथे शुक्रवारी महायुतीची सभा झाली. त्या सभेला पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. सभेपूर्वी दुपारी ३ च्या सुमासास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक दूरध्वनी आला होता. शिवाजी पार्क येथील सभेत मोठी गडबड होणार असल्याचे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.

हेही वाचा : Video: “आज मी शपथ घेतो की…”, कार्यालयाबाहेरील राड्यानंतर मिहीर कोटेचा यांचं ठाकरे गटाला जाहीर आव्हान; म्हणाले, “निवडून आल्यानंतर…”

मुंबई पोलिसांच्या १०० क्रमांकावर हा दूरध्वनी आला होता. सभेत मोठी गडबड होणार असून मुख्यालयाला सांगून तेथील सुरक्षेत वाढ करा, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. त्यानंतर वारंवार त्याला दूरध्वनी केला असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. याबाबत नियंत्रण कक्षातील एका महिला पोलीस शिपायाने आझाद मैदान पोलिसांकडे तक्रारही केली. त्यानुसार दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : मुंबईला ३ वर्षे पुरेल एवढ्या पाण्याची वाफ!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी तपास सुरू केला असता अंधेरी परिसरातून दूरध्वनी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवून पोलिसांनी आरोपीला अटक केली. खोटी माहिती देऊन भीतीचे वातावरण निर्माण करणे, पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.