मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील अमली पदार्थांचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद््ध्वस्त केला. याप्रकरणी मेफेड्रोनची (एमडी) निर्मिती करणाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २४ कोटी ४२ लाख रुपये किंमतीचा एम.डी. व कच्चामाल हस्तगत करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ६ मध्ये जानेवारी २०२५ पासून नशा मुक्त गोवंडी अभियान राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने चेंबूर येथील आरसीएफ पोलीस ठाणे परिसरात गस्त घालताना अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीला ४५ ग्रॅम एमडीसह अटक केली. या व्यक्तीविरोधात आरसीएफ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम ८ (क) व २२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान या पथकाने अमली पदार्थ विक्री करणाऱ्या अन्य पाच आरोपींनाही अटक केली. यापैकी एका आरोपीला नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. अटक आरोपीतांकडून सहा किलो ६८९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १३ कोटी ३७ लाख ६० हजार रुपये आहे. ही कारवाई १५ मे रोजी करण्यात आली.

कर्जतमधील किकवी येथील फार्महाऊसमध्ये शेळी पालन व्यवसायाच्या नावाखाली अमली पदार्थांची निर्मिती सुरू असल्याची बाब आरोपींची चौकशीत उघड झाली. त्या ठिकाणी एमडीचे उत्पादन करण्यात येत होते. एमडीचे उत्पादन करणाऱ्या टोळीपैकी एका आरोपीला तेथे अटक करण्यात आली. अटक आरोपी साथीदारांच्या मदतीने एमडीचा कारखाना चालवत होता. या कारखान्यातून ११ कोटी पाच लाख रुपये किमतीचा ५ किलो ५२५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. याशिवाय एमडीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक साहित्य हस्तगत करण्यात आले.

या गुन्ह्यांत आतापर्यंत २४ कोटी ४७ लाख १० हजार किमतीचा एकूण १२ किलो ६६४ ग्रॅम वजनाचा एमडी व अमली पदार्थांची निर्मितीसाठी लागणारा सुमारे एक कोटी रुपये किमतीचा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक साहित्य हस्तगत करण्यात आले. या कारवाईत अमली पदार्थाची विक्री करणारे पाच आरोपी व उत्पादन करणाऱ्या टोळीमधील एक अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष अभियानात ४२ कोटींचे अमलीपदार्थ जप्त

नशा मुक्त गोवंडी अभियानाअंतर्गत परिमंडळ ६ ने आतापर्यंत एकूण ४२ कोटी ७४ लाख ७१ हजार ८७३ किमतीचे अमली पदार्थ हस्तगत केले. मुंबई पोलिसांच्या परिमंडळ ६ मध्ये जानेवारी २०२५ पासून ” नशा मुक्त गोवंडी अभियान” राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरोधात ७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १८ कोटी ३१ लाख ९१ हजार ८७३ रुपये किमतीचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे.