मुंबई : पोलिस हवालदार प्रवीण सूर्यवंशी (५२) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पत्नी स्मिता सूर्यवंशी (४२) आणि मुलगा प्रतीक सूर्यवंशी (२२) यांना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी अटक केली. सूर्यवंशी यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप आणि शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी तपास करून ४ महिन्यानंतर ही कारवाई केली.

पोलीस कर्मचारी प्रवीण सूर्यवंशी (५२) शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते प्रतीक्षा नगर येथील पोलीस वसाहतीत रहात होते. त्यांचा ९ मे रोजी पडून मृत्यू झाला. सुरुवातीला वडाळा ट्रक टर्मनिनस पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र प्रवीण यांच्या भावाने यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.

शवविच्छेदन अहवालात प्रवीण यांच्या शरीरावर तब्बल ३८ जखमा असल्याचे नमूद केले होते. हा मृत्यू अपघाती नसून अनैसर्गिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

चौकशीत आढळली विसंगती

पोलिसांनी प्रवीण सूर्यवंशी यांच्या पत्नी स्मिता आणि मुलगा प्रतीक यांच्याकडे चौकशी करून जबाब नोंदवले. या दोघांनी पोलिसांना दिलेल्या जबाबांमध्ये तब्बल १५ विसंगती आढळून आल्या. सूर्यवंशी यांचा पत्नीसोबत दीर्घकाळ कौटुंबिक वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी ९ मे रोजीही त्यांच्यात वाद झाला होता. सूर्यवंशी पडून जखमी झाल्यानंतर पत्नी आणि मुलाने मदतीसाठी पोलिसांना बोलावले नव्हते. त्याऐवजी शेजारच्या इमारतीतील एका व्यक्तीला बोलावून प्रवीण यांना रुग्णालयात नेण्यात आले. प्रवीण सूर्यवंशी जखमी अवस्थेत असताना प्रतीक सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेला होता. वैद्यकीय उपचार उशिरा मिळाल्याने प्रवीण यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांना घरात दोन ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. आरोपींची प्रवीण सूर्यवंशी यांच्याबरोबर झटापट झाली आणि त्यांना खिडकीच्या पॅनलजवळ ढकलले, यामुळे काच फुटली आणि शरीरावर अनेक खोल जखमा झाल्याचे आढळून आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय

प्रवीण सूर्यवंशी यांचा पत्नी आणि मुलासोबत आर्थिक कारणांवरून कौटुंबिक वाद होता. ते पगार घरी देत नव्हते. त्यांची कल्याण आणि नाशिक येथील मालमत्ता मुलाने नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. मात्र सूर्यवंशी ते करत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद वाढत होता. मालमत्ता नावावर करण्यास नकार दिल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.