Mumbai Police Notice To Maratha Core Committee: न्यायालयाच्या निर्देशांनंतर मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशांचे उल्लंघन केल्याने १ सप्टेंबर रोजी आंदोलनाबाबत मागितलेली परवानगी नाकारण्यात येत आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच आझाद मैदान रिकामे करावे, असेही आदेशात म्हटले आहे. आझाद मैदान पोलिसांनी याबाबतची नोटीस जारी केली आहे.

मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासह शहरभर विशेष करून दक्षिण मुंबईत भटकंती करणाऱ्या मराठा आरक्षण समर्थकांना आंदोलनाचा अधिकार असला तर त्यांच्या वैधानिक मागणीसाठी मुंबई ठप्प करण्याचा, गैरसोय करण्याचा अधिकार त्यांना कदापि नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी संताप व्यक्त केला होता. तसेच, गेल्या तीन दिवसांपासून विनापरवानगी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मुंबईकरांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील सगळे रस्ते, पदपथ, रेल्वे आणि बस स्थानक मोकळे आणि स्वच्छ करण्यास बजावले.

त्याच वेळी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला खारघरमध्ये परवानगी देण्याची स्पष्ट सूचना न्यायालयाने केलेली असताना सरकारने त्याची अंमलबजावणी का केली नाही, अशी विचारणा करून न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मंबई पोलिसांनी मराठा आरक्षण कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे.

कोर कमिटी सदस्य किशोर मरकट, पांडुरंग तारक, शैलेश मरकट, सुदाम मुकणे, बाळासाहेब इंगळे, अमोल लहाणे, श्रीराम कुरणकर व संजय कटारे या कोर कमिटी सदस्यांच्या नावाने् ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमध्ये आंदोलनकांकडून ११ अटी – शर्तींचा भंग झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे १ सप्टेंबरला आंदोलकांकडून करण्यात आलेला अर्ज फेटाळून मुंबई पोलिसांनी आझाद मैदान लवकरात लवकर रिकामे करावे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याबाबतची नोटीस कोअर कमिटीच्या नावावे जारी केली आहे.