मुंबई : नामांकित कंपनीच्या नावाने बनावट बुटांची विक्री करणाऱ्या कुर्ला येथील एका दुकानावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या दुकानातून पोलिसांनी साडेपाच लाख रुपये किमतीचे बनावट बूट जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदाराला अटक केली.

कुर्ला पश्चिमे येथे मोठ्या प्रमाणात चप्पल आणि बुटांची दुकाने असून या दुकानांमध्ये नामांकित कंपन्यांच्या बनावट बुटांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती कंपनीच्या एका अधिकाऱ्याला मिळाली होती. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची खात्री केल्यानंतर त्यांनी याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुर्ला पश्चिम विभागातील प्रकाश शु मार्ट या दुकानावर मंगळवारी छापा टाकून, एकूण ३०० हून अधिक बुटांच्या जोड्या जप्त केल्या.

नामांकित कंपनीचा लोगोचा वापर केलेल्या बुटांची या दुकानात विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी एकूण ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दुकान मालक युवराज अहिरे (४२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या आरोपीला कुर्ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.