मुंबई : जैन मंदिराच्या रक्षणासाठी, कबुतरखान्यांच्या रक्षणासाठी, गाईंच्या व गोरक्षणाच्या रक्षणासाठी जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी येत्या १ नोव्हेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुट्टीचा दिवस आणि मनसेचा नियोजित मोर्चा या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. जैन मुनींचे हे आंदोलन आता ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुनी निलेश चंद्र विजय यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी जैन मुनी निलेश हे कबुतरांच्या रक्षणासाठी आमरण उपोषण करणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना १ नोव्हेंबरच्या आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे ही परवानगी नाकारल्याचे निलेश चंद्र विजय यांनी सांगितले. तसेच याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाविकास आघाडीनेही मतदार याद्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी मोर्चाची हाक दिली आहे. त्यामुळे जैन मुनींचे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. आता ते ३ नोव्हेंबरला होणार आहे.

जैन समाजाकडून प्रतिसाद मिळणार का ?

दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी सोमवार असून या दिवशी आंदोलनाला परवानगी दिल्यामुळे जैन समाज किती प्रमाणात प्रतिसाद देईल याबाबत आयोजकांनाही शंका आहे. मोठ्या प्रमाणावर व्यापार, दुकाने असलेल्या या जैन समाजातील लोक एक दिवस व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनासाठी उतरतील का अशी शंका उपस्थित केली जात आहे. कबुतरांचा जीव आपल्या एक दिवसाच्या व्यापारापेक्षा जास्त किंमती आहे अशा आशयाचा संदेशही जैन समाजात पाठवला जात आहे. सफेद कपडे घालून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही जैन समाजाला करण्यात आले आहे.

जैन मंदिरे आणि जीवदयासाठी

केवळ कबुतरांच्या रक्षणासाठी नाही तर एकूणच पशू-पक्ष्यांच्या हक्कासाठी आपण ३ नोव्हेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती निलेश चंद्र विजय यांनी दिली. या हिंदुत्ववादी सरकारच्या काळात गाय सुरक्षित नाही, कुत्रे सुरक्षित नाहीत, कबुतर सुरक्षित नाहीत, मठातील हत्ती सुरक्षित नाहीत आणि आता जैन मंदिरेही सुरक्षित नाहीत, असा आरोप निलेश चंद्र विजय यांनी केला.

जैन बोर्डिंग प्रकरणामुळे रोषात भर

दरम्यान, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामुळे जैन समाजाच्या रोषात भर पडली आहे. पुण्यात जैन बोर्डिंगची जागा विकल्याचे प्रकरण बाहेर आल्यामुळे व त्यात भाजपच्याच एका लोकप्रतिनिधीचे नाव चर्चेत असल्यामुळे या प्रकरणाचाही विरोध या आंदोलनात केला जाणार असल्याचे मुनी निलेश यांनी सांगितले.