मुंबई: ऐरोली खाडी पुलावर २० वर्षीय तरुणी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र पोलिसांनी प्रसंगावधानता राखून या तरुणीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

विक्रोळी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन खंदारे मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास ऐरोली चेक नाका येथे गस्त घालत होते. त्यावेळी रिक्षा चालक दामोदर रविदास धावत खंदारे यांच्याकडे आला. ऐरोली खाडी पुलावर एक मुलगी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती रिक्षाचालकाने खंदारे यांना दिली.

खंदारे यांनी तत्काळ कर्तव्यावरील अंमलदार पोलीस हवालदार पाटील (घाटकोपर पोलीस ठाणे), सहारे (नवघर पोलीस ठाणे) व पाटील (पंतनगर पोलीस ठाणे) यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून संबंधित तरुणी पुलाच्या कठड्यावर (रेलिंग) चढण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु समयसूचकता व तत्परतेने पोलिसांनी तिला पकडून खाली आणले आणि आत्महत्येपासून परावृत्त केले.

वडील सोडून गेल्याने नैराश्य

ही तरुणी २० वर्षांची असून नवी मुंबईच्या ऐरोली येथे वास्तव्याला आहे. वडील सोबत राहात नसल्याने, तसेच घरगुती समस्यांमुळे ती नैराश्यात होती. मानसिक तणाव वाढल्यामुळे आत्महत्येचा विचार तिच्या मनात आला, असे तिने पोलिसांना सांगितले.

कुटुंबियांच्या ताब्यात दिले

या तरुणीला ऐरोली चेक नाका पोलीस चौकीत आणून समजावण्यात आले. तिच्या आई आणि मामाशी संपर्क साधून चौकीवर बोलावण्यात आले. त्यांच्या समक्ष तिची समजूत घालण्यात आली आणि आत्महत्येचा निर्णय चुकीचा असल्याचे पटवून देण्यात आले. त्यानंतर तिने भविष्यात असा प्रयत्न करणार नसल्याचे कबूल केले.

पोलिसांच्या प्रसंगावधनाचे कौतुक

पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या तरुणीचा जीव वाचला. पोलीस उपनिरीक्षक नितीन खंदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगधावनाचे कौतुक होत आहे.