मुंबई- रस्त्याने जाणाऱ्या महिलेवर हल्ला करून तिची पर्स चोरणाऱ्या आरोपीला चारकोप पोलिसांनी ७ दिवसात अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी इंटरनेट कॉलचा वापर करत होता. मात्र पोलिसांनी आयडीपीआर तंत्रज्ञानाचा वापर करत त्याचा मागोवा घेत अटक केली. त्याचा दुसरा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
फिर्यादी चारूलता खाचणे (६१) या कांदिवलीच्या डहाणूकर वाडीत राहतात. त्या ३१ मे रोजी सायंकाळी महावीर नगर येथून जात होत्या. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोटारसायकलीवरून दोन अज्ञात इमस आले. त्यांनी रस्त्यावरून चालणाऱया खाचणे यांच्या डोक्यात प्रहार केला होता. त्या हल्ल्यात खाचणे जखमी होऊन खाली पडल्या. मात्र तरी त्यांनी मागे बसलेल्या दुचाकीस्वाराला पकडण्याचा प्रयत्न करून प्रतिकार केला होता. परंतु त्या दोघांनी खाचणे यांच्या खांद्यावर लटकवलेली हॅंडबॅग चोरून पळ काढला होता. त्या बॅगेत दोन हजार रुपये रोख रक्कम तसेच काही महत्वाची कागदपत्रे होती. या अपघातात जखमी खाचणे यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.
हा गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी विविध पथके तयार केली होती. घटनास्थळावरील तसेच आरोपीत ज्या मार्गाने आले सर्व मार्गांवरील सुमारे दिडशे सीसीटीव्ही कॅमेराते चित्रण तपासण्यात आले होते. आरोपी दुचाकीस्वार हे बोरीवलीच्या राजेंद्र नगर परिसरात पसार झाले होते. पोलिसांनी हा परिसर पिंजून काढला. काही संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र ते पोलिसांना चकवा देण्यासाठी इंटरनेट कॉलवर बोलत होते. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. संशयितांचे सीडीआर तसेच इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रिपोर्ट (आयडीपीआर) काढले. त्यावरून अल्ताफ उमर खान (२४) याची ओळख पटली. त्याला राजेंद्र नगर मधून अटक करण्यात आली. तर त्याचा दुसर्या साथीदाराचा शोध सुरू आहे. त्याच्याविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक विलास शेळके (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पवार तसेच तटकरे, पाटेकर, शिंदे, अमित कांबळे, पाटील. आदित्य रामे, शिवराम नवले आदींच्या पथकाने तांत्रिक तपास करून या आरोपील अटक करण्यात यश मिळवले