मुंबई : रेल्वेमधून अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. नुकतीत रेल्वेमधून गांजाची वाहतूक रोखण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. अमली पदार्थ वाहतूक विरोधी गस्ती पथकाने अंदाजे ५.१८ लाख रुपयांचा २० किलो गांजा जप्त केला. तसेच गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात आले.

गाडी क्रमांक १२८८० भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद रेल्वेगाडीमधून गांजाची वाहतूक होत होती. यावेळी कल्याण रेल्वे स्थानकात दोन रेल्वे प्रवाशांकडे बॅगमध्ये गांजा असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, रेल्वे पोलिसांचे पथक गस्तीवर होते. शुक्रवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ६ वर रेल्वेगाडी थांबली असता दोन प्रवासी उतरले. यावेळी गस्तीवर असलेल्या अमली पदार्थ विरोधी विशेष पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या प्रवाशांवर संशय आला. या प्रवाशांना पकडून त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॅगमध्ये २०.६८५ किलो गांजा आढळला. या गांजाची किमत अंदाजे ५,१८,६२५ रुपये आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

आरोपी कुठले

मुंब्रा येथील शीळफाटा येथे राहणारा अकमल खान (३०) आणि मुंब्रा येथील खर्डी गाव येथे राहणारा आबिद शेख (२३) अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींवर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

जुलै महिन्यात देखील कारवाई

जुलै महिन्यात दिल्लीवरून केरळच्या दिशेने जाणाऱ्या मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसमध्ये अमली पदार्थ सापडले होते. मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बल (आयपीएफ), अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी), बंगळुरू व गुन्हे गुप्तचर शाखा (सीआयबी) कुर्ला, यांच्या संयुक्त कारवाईने अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला. तसेच यात नायरेजियन महिला एतुमुदोन डोरिस हिला अटक केली आहे. तपास विभागाने एकूण २.००२ किलो कोकेन आणि १.४८८ किलो वजनाचे मेथॅम्फेटामाइन जप्त केले.

कडक कारवाईचे आदेश

रेल्वेतून होणारी अमली पदार्थाची तस्करी रोखण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. के. कलासागर यांनी सर्व रेल्वे पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करण्यात येत आहे.