मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी एक असा तुळशी तलाव शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधारांनी जोर धरल्याने सातही तलावात सद्यस्थितीत ९०.१६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात असून महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे. एकूण ८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्त जलसाठवण क्षमता असणारा हा तलाव गत वर्षी (२०२४) २० जुलै रोजी भरुन वाहू लागला होता.

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणात किती पाणी ?

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची मिळून एकूण कमाल पाणी साठवण क्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. शनिवारी पहाटे ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार, सातही तलावांमध्ये मिळून १,३०,४९८.१ कोटी लीटर (१३,४,९८१ दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ९०.१६ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

कोणत्या धरणाच्या क्षेत्रात सर्वात पाऊस

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधारांमुळे धरणे ५० टक्के भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दडी मारली. सातही धरणांमध्ये मिळून २६ जुलै रोजी ८८.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. २७ जुलै रोजी पाणीसाठ्यात वाढ होऊन तो ८९.७० टक्क्यांवर पोहोचला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा ८८ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर जवळपास सात दिवस हा पाणीसाठा ८८ टक्क्यांवरच स्थिरावला होता.

ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस कोसळेल अशी आशा मुंबईकरांना होती. मात्र, प्रत्यक्षात पावसाने दडी मारली आहे. ३ ऑगस्ट रोजी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा ८९.०९ टक्क्यांवर पोहोचला. मात्र, त्यानंतर आतापर्यंत त्यात वाढ झालेली नाही. सुमारे दोन आठवड्यांपासून ८९ टक्क्यांवर स्थिरावलेला पाणीसाठा मुसळधारांमुळे ९०. २३ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी सकाळी ६ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, सातही धरणांमध्ये २४ तासांत ३२१ मिमी पाऊस कोसळला. सर्वाधिक म्हणजेच १३३ मिमी पाऊस तुळशी धरणात, तर १२० मिमी विहारमध्ये बरसला.