मुंबई : जुलै महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली होती. संपूर्ण महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, २० जुलैनंतर मुंबईत पाऊस सक्रिय झाला. त्यानंतर २१ आणि २२ जुलैला सलग दोन दिवस हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे पावसाच्या सरासरी आकडेवारीत काहीशी वाढ झाली आहे.

जुलै महिन्यात सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने मुंबईत ओढ दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या, फारसा मुसळधार पाऊस पडलेला नाही. शहर, तसेच उपनगरांत १५ जुलैपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर साधारण २१ आणि २२ जुलैला मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात या दोन दिवसांमध्ये १०० मिमी पावसाची नोंद झाली. पुन्हा २४ जुलै रोजी ७४ मिमी पावसाची नोंद झाली होती. या दोन – तीन दिवसांत पडलेल्या मुसळधारांमुळे पावसाच्या सरासरी आकडेवारीत काहीशी वाढ झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते ३० जुलै दरम्यान ३७८.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ७९०.६ मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे पावसाच्या आकडेवारीत फारशी वाढ झालेली नाही.

तरीही पाऊस कमीच…

मुंबईत बहुतांशी जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यंदा मात्र त्या स्वरुपाचा पाऊस मुंबईत पडला नाही. सुरुवातीचे १५ दिवस कोरडेच गेले. त्यानंतर पाऊस पडला असला तरी तो हलक्या ते मध्यम स्वरुपाचा होता.

जूनमध्येही सरासरीइतकाच

यंदा मुंबईत मोसमी पाऊस लवकर दाखल झाला. ज्यादिवशी दाखल झाला त्याचदिवशी पावसाने दमदार हजेरी लावली होती. अनेक भागात पाणी साचले होते. सर्वाधिक पावसाची नोंद त्यादिवशी झाली. त्यानंतर मात्र पावसाने उघडिप दिली होती. जून महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसातही फारसा पाऊस पडलेला नाही. जून महिन्याच्या अखेरीस शहर तसेच उपनगरांत मुसळधार पाऊस पडला. यामुळे जूनची सरासरी गाठता आली. महिना अखेरीस पाऊस पडला नसता तर सरासरी गाठणे शक्य नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे महिन्यात सर्वाधिक पाऊस

यंदा मे महिन्यात मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून, १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. मेमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मे दरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.