मुंबई, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मंगळवारी पावसाने झोडपले असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. तर हार्बर रेल्वेवर अंधेरीजवळ झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक वांद्रेपर्यंतच सुरु आहे. पावसामुळे पाणी साचले नसले तरी सर्वच यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील काही कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारपासून पुढील तीन दिवस मुंबईसह कोकण परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला होता. कोकणाला सोमवारी रात्रीपासून तर मुंबई आणि उपनगराला मंगळवारी दुपारपासून पावसाने झोडपले. दुपारी मुंबईत ढग दाटून आल्याने अंधार झाला. यामुळे मुंबईकरांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले. ऑगस्टमध्ये पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले होते. मंगळवारी पावसामुळे पुन्हा अडकणार की काय अशी भीती मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली. पावसाची सुरुवात होताच मुंबईतील अनेकांनी घर गाठण्यासाठी लवकर ऑफीसमधून निघण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुपारपासूनच स्थानकांवरील गर्दी वाढली. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सध्या वेळेवर असली तरी मध्य आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक सुरु असून प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

रस्ते वाहतुकीवर पावसाचा किरकोळ परिणाम झाला असला तरी अद्याप पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतूक बंद झाल्याचा प्रकार समोर आलेला नाही. सीप्झ ते हिरानंदानी पवईदरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. घणसोली सब वेमध्ये पाणी साचल्याचे वृत्त आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains heavy rains lash in city bmc on alert train road traffic air service updates central harbour western railway
First published on: 19-09-2017 at 17:55 IST