Mumbai Rains Memes Viral: आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र रविवारी रात्रीपासून पावसाने खूप जोर धरला. मुंबईच्या अनेक भागात पावसामुळे पाणी तुंबले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे आणि विमानाच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. या सर्वांचे पडसाद सोशल मीडियावरही उमटताना दिसत आहेत.

मुंबईत पडणाऱ्या धो धो पावसामुळे शहराला रेड अलर्ट देण्यात आला असून सकाळी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. तर महत्त्वाच्या कामाशिवाय घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला लोकांना देण्यात येत आहे.

रस्त्यावर साचलेले पाणी, वाहतुकीचा खोळंबा यांचे पडसाद आता सोशल मीडियावर पडले असून अनेकांनी यंत्रणेच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला आहे. मुंबईसारख्या एका महागड्या शहरात व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे जर नाहक त्रास भोगावा लागत असेल तर त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे पाऊस सुरू होताच अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवर पाणी साचले. या पाण्यात एक आलिशान मर्सिडीज कार फसल्याचे दिसले. सदर कार पाण्यात अडकल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. या आलिशान गाडीच्या बाजूनेच अनेक दुचाकी आणि रिक्षा चालक आपले वाहन कसेबसे नेताना दिसत आहेत. अखेर वाहूतक पोलिसांनी टोईंग व्हॅन आणून सदर मर्सिडीज तिथून बाहेर काढली.

आणखी एका युजरने ट्विट करत म्हटले, “दक्षिण मुंबईसारख्या भागात प्रभादेव येथे १५ ते २० कोटींना फ्लॅट विकला जातो. पण मुंबईच्या पावसाला त्याची काही एक पडलेली नाही.” या पोस्टसह या परिसरातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जिथे गुडघ्याइतके पाणी साचल्याचे दिसत आहे.

अंधेरीमधील मिलन सबवेमध्येही पाणी साचल्यामुळे हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केटचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे. शाळेची बस पाण्यात फसली असून त्यामधील मुलांना मुंबई पोलीस सुरक्षित स्थळी हलविताना दिसत आहेत.

तसेच विलेपार्ले पश्चिमेला असलेल्या महाविद्यालयाजवळही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत आहे. वांद्र्यामधील पश्चिम द्रुतग्रती महामार्गावरही ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झालेला दिसत आहे.

हवामान विभागाने मुंबईला आधी ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र नंतर बदलून मुंबई, ठाणे, रायगडला पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट दिला आहे.